बेळगाव :
सांबरा येथील बेळगाव विमानतळाच्या धावपट्टीची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. विमानाचे उ•ाण अथवा लँडिंग करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करून त्याचा अहवाल डीजीसीएकडे पाठविण्यात आला. विमानतळ प्राधिकरणाचे संचालक त्यागराजन यांनी अधिकाऱ्यांसमवेत धावपट्टीची पाहणी केली. ज्या ठिकाणी धावपट्टीवर त्रुटी दिसून आल्या त्या लवकर दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली. डीजीसीएच्या नियमावलीनुसार धावपट्टी चांगल्या दर्जाची असणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान महिन्यातून एकदा धावपट्टी तपासणी केली जात असते. बेळगाव विमानतळामधून विमानांची संख्या वाढत असल्याने चांगल्या दर्जाची धावपट्टी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बेळगावमधून अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, जयपूर, बेंगळूर, हैदराबाद या शहरांना विमानसेवा दिली जात आहे. विमानतळावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळ प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.









