रहिवासी वसाहतीचा प्रश्न ऐरणीवर : गावांतील नागरिकांमधून मोठा लढा उभारला जाणार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 48.72 एकर जमीन घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे सांबरा, होनिहाळ, माविनकट्टी, शिंदोळी, बाळेकुंद्री या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विमानतळ प्राधिकरणाने निश्चित केलेल्या जमिनीमध्ये सध्या रहिवासी वसाहती असल्यामुळे या घरांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भूसंपादनाविरोधात या गावांमधील नागरिकांमधून मोठा लढा उभारला जाणार आहे.
बेळगाव विमानतळ हे देशातील एक जुने विमानतळ म्हणून ओळखले जाते. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मोठी विमाने या ठिकाणी येऊ लागली आहेत. मागीलवर्षी बेळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू झाल्याने बोईंग विमाने उतरत होती. पुढील काळात एअरबससारखी मोठी विमाने उतरण्याची शक्यता असल्याने धावपट्टी व सिग्नल व्यवस्था नुतनीकरण करणे आवश्यक आहे. सध्या विमानतळाला लागणारी लायटिंग व्यवस्था ही विमानतळाच्या जमिनीच्या बाहेर असून त्यामुळे बऱ्याचशा अडचणी येतात. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने अधिक जमिनीची मागणी केली आहे.
विमानेच नसताना विस्तारीकरणाची गरज काय?
मागील दोन महिन्यांपासून बेळगावमधून दिल्या जाणाऱ्या विमानसेवा तांत्रिक कारण देत कंपन्यांनी बंद केल्या. मुंबई, दिल्ली, हैदराबाद यासारख्या महत्त्वाच्या शहरांना सेवा बंद झाल्याने प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. नवीन विमाने सुरू करण्याकडे लक्ष न पुरवता जमीन संपादित करण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे सरसावले असल्याने स्थानिकांचा विरोध आहे. पहिला विमाने सुरू करा, त्यानंतर विस्तारीकरणाचा घाट घाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
2006 मध्ये 370 एकर जमीन विमानतळासाठी संपादित
2006 मध्ये 370 एकर जमीन विमानतळ प्राधिकरणाने संपादित केली होती. यामुळे सांबरा, बाळेकुंद्री, होनिहाळ, माविनकट्टी या गावांमधील शेकडो एकर जमिनी विमानतळाला द्यावा लागल्या. कवडीमोलाने जमिनी द्याव्या लागल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. आता पुन्हा एकदा महादेवनगर, शिंदोळी व माविनकट्टी या परिसरात जमिनी घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. असे झाल्यास उरलीसुरली जमीनदेखील शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे.
बेळगाव विमानतळ देशाच्या पटलावर : ग्राहक समाधान क्रमवारीत 16 व्या स्थानी
एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्राहक समाधान क्रमवारीत बेळगाव विमानतळाचा देशात 16 वा क्रमांक लागला आहे. विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सुविधा, स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रवाशांच्या प्रतिक्रिया या सर्व गोष्टींचा विचार करून ही क्रमवारी देण्यात आली आहे.
देशभरातील विमानतळांचे सर्वेक्षण करून दरवर्षी विमानतळ प्राधिकरण क्रमवारी जाहीर करते. यासाठी 33 मानदंड निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक विमानतळाचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी विमानतळांचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी या सर्वांशी चर्चा करून क्रमवारी जाहीर करण्यात आली. बेळगाव विमानतळावरील स्वच्छतागृह, खरेदीसाठीची शॉप्स, टर्मिनलमध्ये स्वच्छता, प्रवाशांच्या साहित्याची तपासणी व वाहतूक, परिसर या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होता. यामध्ये बेळगाव विमानतळाला 4.78 गुण प्राप्त झाले.
इतर विमानतळांच्या तुलनेत बेळगाव विमानतळ स्वच्छ व सुंदर असल्यामुळे या क्रमवारीत बेळगावचा 16 व्या स्थानी क्रमांक लागला. तर शेजारील हुबळी विमानतळ 15 व्या स्थानी आहे. ग्राहकांचे समाधान या क्रमवारीत बेळगावचा समावेश झाल्याने देशाच्या पटलावर विमानतळाची ओळख निर्माण झाली आहे.









