ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात विमानाचे इंधन चोरणाऱ्या टोळीला हडपसर पोलिसांनी रंगेहात अटक केली. या टोळीकडून विमानाला लागणारे 24 हजार लीटर इंधन आणि 8 टँकर असा 2.28 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुनिलकुमार प्राणनाथ यादव, दाजीराम लक्ष्मण काळेल, सचिन रामदास तांबे, शास्त्री कवलु सरोज आणि सुनिल रामदास तांबे अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
विमान इंधन तयार करणाऱ्या एका पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना टँकरमधून इंधनाची चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. रविवारी नवी मुंबईतील वाशी येथून विमान इंधन भरुन एक टँकर शिर्डी विमानतळाकडे रवाना झाला. या टँकरचा मार्ग ठरवण्यात आला. तसेच त्याचा माग काढण्यासाठी त्यामध्ये जीपीआरएस यंत्रणाही बसवण्यात आली होती. लोणीकाळभोर परिसरात बराच वेळ हा टँकर थांबल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी हडपसर पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी लोणीकाळभोर परिसरात छापा टाकून टँकरमधून इंधनाची चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडले. या टोळीकडून विमानाचे 24 हजार लीटर इंधन आणि 8 टँकर असा 2.28 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा : छ. संभाजीनगरमध्ये ‘बीआरएस’ची 14 एप्रिलला सभा








