दक्षिण कोरियातील प्रकार : वैमानिकाकडून चूक : 15 जण जखमी
वृत्तसंस्था/सोल
दक्षिण कोरियात एका लढाऊ विमानाने युद्धसरावादरम्यान चुकून स्वत:च्या देशाच्या नागरिकांवरच 8 बॉम्ब पाडविले आहेत. या घटनेत 15 जण जखमी झाले असून यातील 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. वैमानिकाने चुकीचे कोऑर्डिनेट नेंदवून घेतले होते. यामुळे लोकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी बॉम्ब कोसळल्याचे वायुदलाकडून सांगण्यात आले. या प्रकारानंतर सैन्याभ्यास रोखण्यात आला असून या घटनेत एक चर्च आणि घराचे नुकसान झाले आहे.
ही घटना गुरुवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता पोचियोन शहरात घडली आहे. 8 बॉम्बपैकी केवळ एका बॉम्बमध्ये स्फोट झाला. दक्षिण कोरियाच्या वायुदलाचा अमेरिकेच्या वायुदलासोबत सैन्याभ्यास सुरु होता. यादरम्यान केएफ-16 लढाऊ विमानाने चुकून एमके-82 प्रकारातील 8 बॉम्ब पाडविले. लढाऊ विमानाने पाडविलेले बॉम्ब हे फायरिंग रेंजच्या बाहेर कोसळले.
या घटनेत झालेल्या हानीसाठी माफी मागतो. तसेच प्रभावित लोकांना भरपाई देण्यात येईल. संबंधित भागाच्या आसपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे दक्षिण कोरियाच्या वायुदलाने सांगितले. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्यादरम्यान 20 मार्चपर्यंत युद्धाभ्यास होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकीर्दीतील हा पहिलाच युद्धाभ्यास आहे. उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील वाढत्या संबंधांवरून दोन्ही देश चिंतेत असताना हा युद्धाभ्यास होतोय.









