वृत्तसंस्था / चेन्नई
केंद्रीय सायबर गुन्हा अन्वेषण कक्षाने विमान तिकीटांच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. एका युवकाने म्हैसूर सेल्स इंटरनॅनशल कंपनीच्या लॉगइन सुविधेचा गैरफायदा घेत 17 विमान तिकिटांची खरेदी केल्याचे प्रकरण शनिवारी उघडकीस आले आहे. या 17 तिकिटांपैकी 11 तिकिटे यापूर्वीच दुबईला जाण्यासाठी उपयोगात आणण्यात आली आहेत. कंपनीच्या व्यवस्थापनाने उरलेली 6 तिकीटे आता ब्लॉक केली आहेत. या प्रकरणी तक्रार सादर करण्यात आली असून केंद्रीय सायबर गुन्हा शाखेने कारवाई करुन एका रॅकेटचा भांडाफोड केला.
या ऑन लाईन घोटाळ्यामुळे या प्रवासी कंपनीला 2.8 लाख रुपयांचा फटका बसला आहे, अशी माहिती कंपनीच्या अॅडमिन प्रमुखाने दिली आहे. अज्ञात युवकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा तिकिटांवर प्रवास केलेल्या प्रवाशांची चौकशी करताना पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली असून त्याअनुसार कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नसली तरी या विमान तिकीट रॅकेटचे महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ही तिकीटे विकणाऱ्याचा शोध घेतला जात असून लवकरच तो पडकला जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, विमान कंपन्यांनी यापुढे सावधगिरी बाळगावी आणि पूर्ण तपासांतीच तिकीटे रिलीज करावीत, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. हा प्रकार गेल्या आठवड्यात लक्षात आला आहे.









