कोल्हापूर / इम्रान गवंडी :
महापालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मनपा प्रशासनाने नुकताच इस्रोचा अभ्यास दौरा घडवून आणला. जे स्वप्नातही पाहिले नाही, ते सत्यात उतरले अशाच काहीशा भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. विमान प्रवास, इस्रो, अवकाश सारे काही अद्भूत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
इस्रो अभ्यास दौऱ्यामुळे महापालिका शाळांचा डंका राज्याभर पिटला आहे. यासह महापालिका शाळांना कमी समजणाऱ्यांना चांगली चपराकही दिली आहे. शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य व जिल्हा स्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्याद्वारे हवाई सफर करत हम भी कुच्छ कम नहां… चा प्रत्यय सर्वांच्या डोळ्यासमोर आणून दिला आहे. यावरूनच महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता व दर्जा स्पष्ट झाला आहे.
पालकांमध्ये खासगी शाळेचे फॅड वाढले आहे. शेजारचा मुलगा खासगी शाळेत शिकतो म्हणून माझा मुलगाही खासगी शाळेत शिकावा असा हट्ट असतो. महापालिका शाळा म्हंटले की वेगळाच दृष्टीकोन असतो. आता तर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी इस्रोचा अभ्यास दौरा केला आहे. आणि तोही विमानातून. यामुळे विद्यार्थ्यांना एक उर्जा मिळाली आहे. काहींनी आयुष्याला कलाटणी देणारा दौरा असुन शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा जागृत झाल्याचे सांगितले.
- इस्रोला जाण्याचे स्वप्न बाळगून परिक्षेची तयारी
इस्रेला जाण्याचे स्वप्न मनाशी बाळगून पाचवी शिष्यवृत्ती अभ्यासाला सुरुवात केली. विमानाने प्रथमच प्रवास करण्याचा अनुभव अलौकिक होता. आजपर्यंत जत्रेच्या विमानात बसत होते. खऱ्या विमानात बसुन ढगांच्या गर्दीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. देशासाठी शास्त्रज्ञांचे सुरू असलेले कामाच्या प्रेरणेने शास्त्रज्ञ होऊन इस्रेमध्ये काम करण्याचा नक्कीच प्रयत्न राहील.
हर्षदा सुतार, टेंबलाईवाडी विद्यालय
- शास्त्रज्ञ होण्याची इच्छा जागृत
विमानातून प्रवास करताना पहिल्यांदा थोडी भीती वाटली. विमानतले दृश्य पाहून पंख फुटल्यासारखे वाटले. इस्रो भेटीत सॅटेलाईटकडून मेसेज पृथ्वीपर्यंत कसे पोहचतात याची माहिती मिळाली. इस्रे दौऱ्यामुळे शास्त्रज्ञ होण्याची इच्छा निर्माण झाली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू तारांगण पाहताना अवकाशात गेल्यासारखे वाटले, ग्रह, तारे कसे दिसतात, त्यांचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाची सखोल माहिती मिळाली.
मृणाली जाधव, जरगनगर विद्यालय
- आयुष्याला कलाटणी देणारा अभ्यास दौरा
महापालिका प्रशासनामुळेच पहिल्यांदा विमान प्रवास करू शकलो. इस्रो भेटीमध्ये शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष भेट झाली. सॅटेलाईट मेसेज, कमांडिंग नेटवर्क, टेलीमेट्री ट्रेकिंग शिकवले. इस्रोचे निर्माते विक्रम साराभाई यांनी सायकलवरून पहिले रॉकेट लॉंच केलेली कामगिरी पाहून थक्क झालो. अवकाशातील ग्रह संशोधनांची माहिती मिळाली. सारे काही अद्भुत असे वाटत होते. आयुष्यात कधीही न विसरणारा इस्रोचा अभ्यास दौरा निश्चितच आयुष्याला कलाटणी देणारा ठरेल.
स्वयं सुरेश सुतार, जरगनगर विद्यालय
- अविस्मरणीय क्षण
विमानप्रवास या शब्दाने आयुष्यच बदलून गेले. घरापासून दूर जाण्याचे दु:ख वाटत होते पण जगातील सर्वात प्रसिद्ध भारतीय अवकाश संशोधन संस्था घ्एRध् इथे जाण्याची संधी आम्हाला खुणावत होती. अभ्यास दौऱ्याने परत येताना अविस्मरणीय क्षण सोबत आले आहेत.
संकल्प सचिन चव्हाण, जरगनगर विद्यालय
- हा उपक्रम निरंतर सुरू ठेवावा
इस्त्रो अभ्यास दौरा या प्रकल्पामुळे भारताच्या वेगवेगळ्या अवकाश मोहिमांबद्दल प्रत्यक्ष माहिती घेता आली. आगामी ‘चांद्रयान’ – 5 आणि ‘गगनयान’ या अवकाश संशोधनाविषयी माहिती मिळाली. विमानातून प्रवास केल्यामुळे खूप आनंद झाला. यापुढेही हा उपक्रम निरंतर सुरू ठेवावा. यातून अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळावी, अशी इच्छा आहे.
धैर्यशील माळी, टेंबलाईवाडी विद्यालय








