दिवाळी सणादरम्यान विमान कंपन्यांकडून मनमानी भाडेवाढ
► वृत्तसंस्था/ जयपूर
विमान प्रवासाकडे वाढत असलेला ओढा लक्षात घेत दिवाळीसारख्या ऐन सणासुदीच्या काळासाठी विमान कंपन्यांनी वाढीव भाडेदर आकारत प्रवाशांना धक्का दिला आहे. दिवाळी जवळ आल्याने विमान कंपन्यांनी पुन्हा एकदा मनमानी भाडेवाढ करण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीला अजून दोन महिने बाकी असताना महत्त्वाच्या मार्गावरील हवाई प्रवास 4 ते 5 पटीने महाग झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा दिवाळीच्या दोन महिन्यांपूर्वीच विमान कंपन्यांनी तिकीट दरात चार ते पाच पट वाढ केली आहे. प्रत्येक विमानफेऱ्या आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यासाठी येत्या काळात वाढीव दर लागू केले जाणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. विमान कंपन्यांनी विचारपूर्वक धोरण म्हणून भाडे वाढवले आहे. जास्त रहदारी असणाऱ्या मार्गांवर अधिक भाडेवाढ केल्याचेही दिसून येत आहे. जयपूरहून बेंगळूर, हैदराबाद, चेन्नई, पुणे, मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये जास्त फेऱ्या असून तेथेच तिकीटवाढ केली आहे. या शहरांमध्ये नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने बरेच लोक प्रवास करत असतात. तसेच दिवाळी सणाच्या काळात या मार्गावर पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची संधी साधत विमान कंपन्या आर्थिक फायदा उठवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
डीजीसीएकडून कारवाई नाही!
डीजीसीएने विमान कंपन्यांच्या भाड्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र भाडेवाढीमुळे अद्याप कोणत्याही विमान कंपनीवर कठोर कारवाई झालेली नाही. दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण असल्याने या काळात देश-विदेशात कार्यरत असलेल्या प्रत्येकाला आपापल्या घरी परतायचे असते. त्यामुळे आतापासून भाड्यात मोठी वाढ करण्यात आली आहे. साहजिकच दिवाळीच्या मुहूर्तावर विमान प्रवास करणाऱ्यांना तिकिटांचे दर पाहूनच प्रवास करण्याचा विचार करावा लागणार आहे.









