बोको हरामचे 100 दहशतवादी ठार : वायुदलाने जारी केला व्हिडिओ
► वृत्तसंस्था/ अबुजा
नायजेरियाच्या वायुदलाने बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या तळांवर एअरस्ट्राइक केला आहे. या हवाईहल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. वायुदलाने या हल्ल्याचे लाइव्ह फुटेज देखील जारी केले आहे. बोको हराम ही पूर्व आफ्रिकेतील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आहे. येथील अनेक देशांमध्ये या दहशतवादी संघटनेने स्वत:च्या कारवाया चालविल्या आहेत. अमली पदार्थांची तस्करी आणि अपहरणाद्वारे खंडणी वसूल करण्याचे कामही या दहशतवादी संघटनेकडून केले जाते.
बोको हरामच्या दहशतवाद्यांच्या ठावठिकाण्याविषयी गुप्तचर यंत्रणेचा अहवाल मिळाला होता. नायजेरियाच्या वायुदलाने सुमारे आठवडाभर तयारी करत वोजा भागात हवाई हल्ले केले आहेत. या भागाला दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला मानले जाते.
वायुदलाने 9-11 जूनदरम्यान अनेकदा हवाई हल्ले केले आहेत. हा भाग पर्वतीय असल्याने येथे सैन्य कारवाई करणे अवघड ठरते. दहशतवादी पर्वतीय भागांमध्ये लपून सैनिकांवर गोळीबार करत असल्याने नायजेरियाच्या सरकारकडून वायुदलाला कारवाईची जबाबदारी सोपविण्यात आली होती.









