पाचवीपर्यंतच्या शाळांना दोन दिवस सुटी जाहीर, वाहनांच्या वापरावरही मर्यादा : प्रदूषण वाढल्याने एअर प्युरिफायर वापरण्याचा सल्ला
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
शेतांमधील आगीच्या घटना आणि प्रतिकूल हवामानामुळे दिल्लीत गुऊवारी हवेची गुणवत्ता पातळी आणखीनच घसरली होती. धुक्यामुळे आकाशात ‘धुंद’ वातावरण तयार झाल्याने सूर्यही दिसेनासा झाला होता. याचदरम्यान, प्रदूषण पातळी वाढल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दिल्ली सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. वाहनांच्या वापरावर मर्यादा घालण्यात आल्या असून पाचवीपर्यंतच्या शाळांना पुढील दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली आहे. दिल्लीतील प्रदुषणकारी हवामान स्थितीमुळे डॉक्टरांनी श्वसनाच्या समस्या वाढण्याचा इशारा दिला. प्रदुषणाची पातळी वाढत असल्याने लहान मुले आणि वृद्धांमध्ये दमा आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या वाढू शकतात, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी लोकांना आपल्या घरात एअर प्युरिफायर वापरण्याचा सल्ला दिला.
पुढील दोन आठवड्यांत दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. प्रदुषणाचे वाढते प्रमाण चिंताजनक पातळीवर असून अनेक भागात हवेचा दर्जा निर्देशांक आधीच 400 पेक्षा जास्त आहे. शहरातील अनेक भागात हवेची गुणवत्ता पातळी ‘गंभीर’ श्रेणीत पोहोचली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सफदरजंग वेधशाळेतील दृश्यमानता 500 मीटरपर्यंत घसरली होती. दिवसभरात तापमान वाढत राहिल्याने ती 800 मीटरपर्यंत वाढली होती. दुपारी 3 वाजता शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 378 वर पोहोचला. 24 तासांचा सरासरी ‘एक्यूआय’ बुधवारी 364, मंगळवारी 359, सोमवारी 347, रविवारी 325, शनिवारी 304 आणि शुक्रवारी 261 इतका नोंदवण्यात आला होता.
सरकारने वाहनांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘गाडी बंद’ मोहीम सुरू केली आहे आणि सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी आणि वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी 1,000 खासगी सीएनजी बस भाड्याने घेण्याची योजना आखली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या विश्लेषणानुसार, 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळात राजधानीत प्रदूषण वाढणार असून सध्या पंजाब आणि हरियाणामध्ये शेतांमधील रान जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. हरियाणात सुमारे 14.82 लाख हेक्टर जमिनीवर भाताची लागवड केली जाते. यातून 73 लाख टनांहून अधिक भाताच्या पेंढ्याचे उत्पादन अपेक्षित आहे. यंदाच्या वर्षात शेत जाळण्याच्या घटना पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न राज्यात सुरू आहे. मात्र, त्याला यश येताना दिसत नाही.









