मुंबई, दिल्ली, चेन्नई यासारख्या महत्त्वाच्या शहरांना दररोज विमानसेवा नसल्याने परिणाम
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ऑगस्ट महिन्यात कमी झाली आहे. महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा बंद असल्याने त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर होत आहे. मागील महिन्यापेक्षा ऑगस्टमध्ये प्रवासी संख्या 8.09 टक्क्यांनी घसरली असल्याचे समोर आले आहे. ऑक्टोबरमध्ये बेळगाव-दिल्ली विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवासीसंख्येत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
ऑगस्ट महिन्यात बेळगावमधून 21,308 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. जुलै महिन्याच्या तुलनेत ही संख्या 1876 ने घसरली. जुलै महिन्यात 23,184 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात 513 विमानांच्या फेऱ्या झाल्या आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई यासारख्या महत्त्वाच्या शहरांना दररोज विमानसेवा नसल्याने याचा परिणाम प्रवासीसंख्येवर होताना दिसत आहे.
सध्या बेळगावमधून बेंगळूर, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, सुरत, इंदोर, जोधपूर, जयपूर, तिरुपती या दहा शहरांना विमानसेवा सुरू आहे. यातील बऱ्याच शहरांना आठवड्यातील काही मोजकेच दिवस विमानसेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून बेळगाव-दिल्ली विमानफेरीला पुन्हा एकदा प्रारंभ होणार असून यामुळे प्रवासीसंख्या वाढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.