सध्या वायुदलाच्या पश्चिम कमांडची सांभाळताहेत जबाबदारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दलांमधील शूरवीरांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वायुदलाचे एअर मार्शल पंकज सिन्हा यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. एकूण 29 जणांना परम विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात येणार आहे. एअर मार्शल पंकज सिन्हा हे सध्या वायुदलाच्या पश्चिम कमांडची जबाबदारी सांभाळत आहेत.
एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांनी 1 जानेवारी रोजी वायुदलाच्या पश्चिम कमांडची जबाबदारी हाती घेतली आहे. नॅशनल डिफेन्स अपॅडमीतून प्रशिक्षण मिळविलेले एअर मार्शल सिन्हा हे जून 1985 मध्ये वायुदलात लढाऊ वैमानिक म्हणून नियुक्त झाले होते. याचबरोबर सिन्हा हे वेलिंग्टन येथील प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थी राहिले आहेत. एक अनुभवी लढाऊ वैमानिक, ‘अ’ श्रेणी प्राप्त फ्लाईंग इन्स्ट्रक्टर, फायटर स्ट्राईकर लीडर, इन्स्ट्रुमेंट रेटिंग इन्स्ट्रक्टर तसेच परीक्षकाच्या स्वऊपात ते विविध पदांवर कार्यरत राहिले आहेत. एअर मार्शल सिन्हा यांच्याकडे 4500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.
एअर मार्शल सिन्हा यांनी 37 वर्षांपेक्षा अधिक स्वत:च्या सेवाकाळात अनेक महत्त्वपूर्ण कमांड आणि स्टाफ नियुक्तींवर काम केले आहे. यात फायटर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर आणि फ्लाईंग स्टेशनवर चीफ इन्स्ट्रक्टर (फ्लाईंग) यासारखी नियुक्ती सामील आहे. तसेच ब्रिटनमध्ये रॉयल एअर फोर्स व्हॅलीमध्ये ट्रेनिंग कोऑर्डिनेशन ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले आहे. तेथे त्यांनी हॉक विमानाचे उ•ाण केले होते. एअर मार्शल सिन्हा यांनी वायुदल मुख्यालयात मुख्य संचालक कार्मिक अधिकारी, वायुदल प्रमुखांचे मुख्य साहाय्यक, वायुदल मुख्यालयात एअर स्टाफ ऑपरेशन्स (ऑफेन्सिव्ह)चे साहाय्यक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सिन्हा हे एका प्रमुख लढाऊ स्क्वाड्रनचे कमोडोर कमांडंट आहेत. तसेच नव्या नियुक्तीपूर्वी वायुदल मुख्यालयात डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स या पदावर ते कार्यरत होते.
एअर मार्शल पंकज सिन्हा यांना ‘विशिष्टसेवा पदक’ आणि ‘अतिविशिष्ट सेवा पदका’ने यापूर्वी गौरविण्यात आले आहे. पंकज सिन्हा यांनी एअर मार्शल एस. प्रभाकरन यांचे स्थान घेतले आहे. प्रभाकरन हे वायुदलात 39 वर्षांहून अधिककाळ विशिष्ट सेवा बजावल्यावर 31 डिसेंबर 2022 रोजी सेवानिवृत्त झाले होते.
बेळगावशी नातेसंबंध
शहराच्या भाग्यनगरमधील निवृत्त एअर मार्शल (दिवंगत) शरदकुमार देशपांडे आणि कलाताई देशपांडे यांची कन्या अनिता यांचे एअर मार्शल सिन्हा हे पती आहेत. या पार्श्वभूमीवर एअर मार्शल सिन्हा यांचे बेळगाव शहराशी दृढ नाते आहे.









