खेड :
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज कंपनीत शनिवारी सायंकाळी 5 च्या सुमारास झालेल्या वायुगळतीने खळबळ उडाली. वायुगळतीचा एका कामगारास किरकोळ त्रास झाल्याचे समजते. कंपनीतील सर्व कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला. वायुगळतीनंतर नजीकचे ग्रामस्थही आक्रमक झाल्याने जादा पोलिसांची कुमक तैनात करण्यात आल्याचे समजते. सायंकाळी उशिरा वायुगळती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.
कंपनीत वायुगळती झाल्याची बाब निदर्शनास येताच कंपनी व्यवस्थापनाची त्रेधातिरपीटच उडाली. कंपनीतील सर्व कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. वायुगळती आटोक्यात आणण्यासाठी लोटे एमआयडीसीतील अग्निशमन यंत्रणा व तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी पोहचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. या कंपनीतील स्टोअर रिसेल लिकेज झाल्याने वायुगळतीचा प्रकार घडल्याचे स्पष्ट करण्यात आले. वायुगळतीने कोणत्याही कामगाराला धोका पोहचला नसल्याचेही सांगण्यात आले. या कंपनीत झालेल्या वायूगळतीनंतर नजीकच्या कंपनीतील कामगारांमध्यही भीतीचे वातावरण पसरले होते. शिवाय नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहचून कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले.








