प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळुरातून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोणीही जखमी झालेले नाहीत, अशी माहिती एअर इंडिया एक्स्प्रेसने दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास विमानाच्या एका इंजिनला टेक ऑफच्या काही मिनिटांतच आग लागली. कर्मचाऱ्याने हवाई वाहतूक नियंत्रकाला माहिती दिल्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले.
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर लगेचच इंजिनची आग विझवण्यात आली. 18 मे रोजी बेंगळूरहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने बीएलआर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. संपूर्ण आणीबाणी घोषित करून लँडिंगनंतर लगेचच आग विझवण्यात आली. सर्व 179 प्रवासी आणि सहा कर्मचाऱ्यांना विमानातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले, असे बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले.









