वृत्तसंस्था/ लंडन
अमृतसरहून इंग्लंडमधील बर्मिंगहॅमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-117 चे (बोईंग ड्रीमलाइनर 787-8) बर्मिंगहॅम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान बर्मिंगहॅमला पोहोचण्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना काही तांत्रिक दोषामुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. रॅम एअर टर्बाइनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आल्यामुळे वैमानिकांनी सावधगिरीची उपाययोजना म्हणून विमान सुरक्षितपणे उतरवल्याची माहिती विमान प्राधिकरणाकडून निवेदनाद्वारे देण्यात आली. यशस्वी लँडिंगमुळे सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित राहिले. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:52 वाजता अमृतसरहून निघालेले हे विमान सुमारे 10 तास 45 मिनिटांनी बर्मिंगहॅमला पोहोचले होते.









