डीजीसीएची कारवाई ः पायलट 3 महिन्यांसाठी निलंबित
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याप्रकरणी वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच विमानाच्या पायलटचे लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. याचदरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एअर इंडियाने एक समिती स्थापन केली असून त्याने शंकर मिश्राला 4 महिन्यांसाठी एअरलाईन्समध्ये प्रवास करण्यास बंदी घातली होती. आपल्या अशिलावर घालण्यात आलेली चार महिन्यांची बंदी चुकीची असल्याचा दावा आरोपी शंकर मिश्राच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.
डीजीसीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअर इंडियाला दंड ठोठावला आहे. विमानाच्या पायलटने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याने पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच विमानाच्या डायरेक्टरला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोने त्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.
न्यूयॉर्कमधून दिल्लीला येणाऱया एका विमानात मद्यधुंद व्यक्तीने एका 70 वषीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. सदर महिला प्रवाशाने यासंदर्भात केबिन क्रू ला माहिती दिल्यानंतरही संबंधित व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर तपास सुरू झाला होता.









