वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांना आर्थिक वर्ष 2025 मध्ये 9568 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मार्च 2025 ला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सदरचा तोटा कंपनीला झाला असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले आहे.
मागच्या आर्थिक वर्षामध्ये अकासा एअर आणि स्पाइस जेट यांनी अनुक्रमे 1983 कोटी रुपये आणि 58 कोटी रुपये इतका करपूर्व तोटा सहन केला होता तर दुसरीकडे इंडिगो एअरलाइन्सने मात्र 7587 कोटी रुपये करपूर्व नफा मिळवला आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने 3890 कोटी रुपयांचा तोटा आर्थिक वर्षांमध्ये सहन केला आहे तर यांची किफायतशीर किंमतीत विमान प्रवास घडवणारी सहकारी कंपनी एअर इंडिया एक्सप्रेसने 5678 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. यापूर्वी ही कंपनी नफ्यामध्ये होती.
कोणावर किती कर्जाचा बोजा
जानेवारी 2022 मध्ये टाटा समूहाने टाटा एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्हींचे अधिग्रहण केले होते. एकंदर पाहता एअर इंडियाच्या डोक्यावर सध्या 26,879 कोटी रुपयांचा बोजा आहे तर इंडिगोचा बोजा वाढून 67 हजार 88 कोटी रुपयांवर पोहचला आहे. दुसरीकडे इतर विमान कंपन्या जसे की एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्पाइस जेट यांचे एकूण कर्ज अनुक्रमे 617 कोटी, 78.5 कोटी आणि 886 कोटी रुपये इतके आहे.









