उडी मारल्याने दोन्ही पायलट जखमी : मिराज-2000 शेतात कोसळताच आगीच्या भक्ष्यस्थानी.अपघातापूर्वी दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटद्वारे मारली उडी
वृत्तसंस्था/शिवपुरी
मध्य प्रदेशातील शिवपुरी जिह्यात हवाई दलाच्या लढाऊ विमानाला गुरुवारी मोठा अपघात झाला. ‘मिराज-2000’ हे विमान कोसळल्यानंतर मोठी आग लागली. इंजिनला आग लागण्यापूर्वी पायलटने पॅराशूटच्या मदतीने उडी मारली. अपघातानंतर विमानाला आग लागली. मदत आणि बचावकार्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. दोन्ही पायलटना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, या दुर्घटनेमागील नेमके कारण उघड झालेले नाही. दरम्यान, हवाई दलाचे अधिकारी सखोल तपासासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. भविष्यात असे अपघात रोखता यावेत आणि विमानांची सुरक्षितता सुनिश्चित करता यावी यासाठी सध्या हवाई दलाकडून या घटनेची चौकशी केली जात आहे.
हवाई दलाच्या विमानाची दुर्घटना शिवपुरीमधील सुनारी पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात घडली आहे. येथे उ•ाण केल्यानंतर काही वेळातच लढाऊ विमान कोसळले. हे मिराज लढाऊ विमान असल्याचे सांगण्यात आले. लढाऊ विमानाने ग्वाल्हेरहून उ•ाण केले होते. विमान कोसळल्यानंतर स्थानिक लोक तिथे पोहोचले. लोकांनी जखमी पायलटला तात्काळ मदत केली. गावकऱ्यांनी घटनेचे व्हिडिओ बनवले आहेत. त्यात अपघातानंतर पायलट फोनवर अधिकाऱ्यांना दुर्घटनेबद्दल माहिती देत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यप्रदेशातील शिवपुरीजवळ गुरुवारी दुपारी नियमित प्रशिक्षण उ•ाणादरम्यान दोन आसनी असलेले मिराज 2000 लढाऊ विमान कोसळले. अपघाताची कारणे शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्थानिकांकडून पायलटला मदत
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांनी जवळपास शोध घेतला तेव्हा पायलट शेतात जखमी अवस्थेत विव्हळत पडलेले दिसले. त्यांची प्रकृती गंभीर होती. ते बेशुद्ध पडले होते. गावकऱ्यांनी त्यांना पाणी पाजून सावध केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने इस्पितळात दाखल केले. अपघातामुळे घटनास्थळी गर्दी वाढतच गेली. मात्र, हवाई दलाच्या पथकाने आणि पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेत योग्य पावले उचलली.









