राजस्थानमध्ये लढाऊ विमान घरावर कोसळल्याने 3 महिलांचा मृत्यू, पायलट सुरक्षित
वृत्तसंस्था/ जयपूर, नवी दिल्ली
राजस्थानमध्ये हनुमानगड जिल्ह्यात सोमवारी सकाळी हवाई दलाचे मिग-21 विमान अपघातग्रस्त झाले. लढाऊ विमान घराच्या छतावर कोसळल्यामुळे तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच अन्य तिघे नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत पायलट सुखरूप असला तरी त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राजस्थानमधील हनुमानगड येथे कोसळले. सदर विमान नियमित प्रशिक्षण उ•ाणावर असताना हनुमानगड जिह्यातील पिलीबंगा येथील बहलोल नगर गावाजवळ एका घरावर कोसळले. अपघातादरम्यान पायलटने पॅराशूटमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मात्र विमान घरावर पडताच आजूबाजूचे लोक त्याच्या कचाट्यात आले. या अपघातात आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. बन्सो, बंटो आणि लीलादेवी अशी मृतांची नावे आहेत. हनुमानगड सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी एसएचओ लखबीर सिंग यांनी तिघांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या अपघातात एका पुऊषासह तिघे जखमी झाले. लढाऊ विमानाचा पायलट राहुल अरोरा (वय 25) आणि सहवैमानिक सुखरूप आहेत. जखमी पायलटला एअरलिफ्ट करण्यात आले आहे. वैमानिकासाठी हवाई दलाचे एमआय 17 विमान पाठवण्यात आले आहे.
मिग-21 कोसळलेल्या घरात तीन महिला आणि एक पुऊष उपस्थित होते. या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या विमला उर्फ निक्की या महिलेला हनुमानगढ शहरातील सरकारी ऊग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. एएसआय लालचंद यांनी सध्या या महिलेच्या रिकव्हरीची माहिती दिली आहे. त्याचवेळी, अपघातात जखमी झालेल्या अन्य दोन महिलांवर पिलीबंगा आणि हनुमानगड ऊग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक लोकांची पायलटला मदत
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली. मदतीसाठी पिलीबंगा पोलीस आणि लष्कराचे हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर गावातील लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पॅराशूटच्या सहाय्याने उतरलेल्या पायलटला लोकांनी सावलीत झोपवत प्रथमोपचार केले. याचदरम्यान विमान पडलेल्या घरातील आग काही लोकांनी विझवली. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ऊग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या.
पायलटच्या हुशारीमुळे मोठा अपघात टळला
पायलट राहुल अरोरा हे हनुमानगडमध्ये कोसळलेले मिग-21 विमान उडवत होते. त्यांच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली. अपघाताच्या वेळी दाट लोकवस्तीच्या भागातून विमान दूर नेण्यात त्यांनी यश मिळवले. ज्या घरावर विमान पडले ते निवासी भागातील सर्वात शेवटचे घर होते. पायलटने विमान गावाच्या बाहेर आणले नसते तर विमान दाट लोकवस्तीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती, अशी चर्चा घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींमध्ये सुरू होती. मात्र, विमान घरावर कोसळून तीन महिलांचा मृत्यू झाल्याने हळहळही व्यक्त होत होती.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हनुमानगडच्या सुरतगडमध्ये मिग-21 विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. गेहलोत यांनी पायलट आणि इतर जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुरतगडमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू होणे दु:खद आहे. मृतांच्या नातेवाईकांना नियमानुसार चिरंजीवी विम्याची मदत दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
गेल्या वर्षभरात हवाई दलाचे मिग 21 विमान कोसळण्याची ही सातवी घटना आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये घडलेल्या शेवटच्या घटनेत हवाई दलाचे दोन पायलट हुतात्मा झाले होते. 2021 मध्ये पाच मिग-21 च्या पाच दुर्घटनांमध्ये तीन वैमानिकांचा मृत्यू झाला. मिग-21 हे भारतीय हवाई दलाने उडवलेल्या सहा लढाऊ विमानांपैकी एक आहे. सिंगल-इंजिन, सिंगल-सीटर मल्टी-रोल फायटर/ग्राउंड अटॅक प्लेन प्रथम 1963 मध्ये इंटरसेप्टर विमान म्हणून समाविष्ट करण्यात आले होते.









