हरियाणातील पंचकुला येथे दुर्घटना : पॅराशूटच्या मदतीने वैमानिकाने वाचवले प्राण, चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था/पंचकुला, नवी दिल्ली
हरियाणातील पंचकुला येथे शुक्रवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. हे विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उ•ाणासाठी निघाले होते. सुदैवाने पॅराशूटचा वापर केल्याने वैमानिक विमानातून सुरक्षित बाहेर पडला. अपघातात जीवितहानी झाली नसली तरी अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. हरियाणातील पंचकुलाच्या डोंगराळ भागात मोरनी येथील बलदवाला गावाजवळ हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळल्याची माहिती हवाई दल अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. विमान कोसळण्यापूर्वी, वैमानिकाने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवला.
या दुर्घटनेत लढाऊ विमान पूर्णपणे जळाले असून विमानाचे भाग इकडे-तिकडे विखुरले होते. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाल्याचे मानले जात आहे. हवाई दलाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शुक्रवारी नियमित प्रशिक्षण उ•ाणादरम्यान जॅग्वार विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते कोसळल्याचा दावा केला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परिसर सील करण्यात आला असून मदत व बचावकार्य सुरू आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी हवाई दलाने तपास सुरू केला आहे.
डोंगराळ भागात कोसळले विमान
मिळालेल्या माहितीनुसार, पंचकुलाच्या डोंगराळ भागात असलेल्या मोरनी येथील बलदवाला गावाजवळ हे लढाऊ विमान कोसळले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान झाडांवर आदळल्यानंतर जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका दरीत कोसळले. विमान पडताच त्याला आग लागली आणि त्याचे अनेक तुकडे झाले. विमानाचे भाग आजूबाजूच्या परिसरात विखुरलेलेही आढळले.









