चीन-पाक सीमेवर होणार ‘त्रिशुल’चे आयोजन : राफेल-मिराज लढाऊ विमानांचा सहभाग
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदल लवकरच ‘त्रिशुल’ या मोठ्या युद्धाभ्यासाचे आयोजन करणार आहे. भारतात जी-20 परिषदेदरम्यान जगभरातील दिग्गज नेते नवी दिल्ली येथे एकत्र येणार असताना हा युद्धाभ्यास पार पडणार आहे. हा युद्धाभ्यास चीन अन् पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर आयोजित होणार असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

त्रिशुल युद्धाभ्यासात राफेल, मिराज, सुखोई 30एमकेआय समवेत अनेक लढाऊ विमाने सामील होणार आहेत. याचबरोबर युद्धाभ्यासात चिनूक आणि अपाचे समवेत अनेक हेलिकॉप्टर्स देखील आकाशात स्वत:चे सामर्थ्य दाखवून देणार आहेत. वायुदलाच्या या शक्तिप्रदर्शनात गरुड विशेष दल देखील भाग घेणार आहे. त्रिशुल युद्धाभ्यास 4 सप्टेंबरपासून 14 सप्टेंबरपर्यंत लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये पार पडणार आहे.
भारतीय वायुदलाने 9-10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी स्वत:ची शस्त्रास्त्रs अन् उपकरणे हायअलर्टवर ठेवली आहेत. या परिषदेत अनेक जागतिक नेते सामील होणार आहेत. भारतीय वायुदलाने कुठल्याही संभाव्य हवाई धोक्याला रोखण्यासाठी आकाश सुरक्षा यंत्रणेसमवेत स्वत:च्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांना सक्रीय करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्वत:ची ड्रोनविरोधी यंत्रणाही सक्रीय केली आहे. या यंत्रणेद्वारे कुठल्याही ड्रोनला रोखता येणार आहे तसेच प्रसंगी ड्रोन हवेत नष्टही करता येणार आहे. जी-20 शिखर परिषदेपूर्वी दिल्ली पोलिसांनी सुरक्षा कारणांस्तव 29 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय राजधानीत पॅराग्लायडर, हँग ग्लायडर आणि हॉट एअर बलून यासारख्या उप-पारंपरिक हवाई प्लॅटफॉर्म्सच्या उ•ाणांवर बंदी घातली आहे.









