सैन्य दिन पुण्यात आयोजित होणार ः वायूदल दिन सोहळा चंदिगडमध्ये
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सैन्य दिन आणि वायुदल दिन संचलनाचे दिल्लीबाहेर आयोजन केले जाऊ शकते. सैन्य दिन दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो, यानिमित्त दिल्लीच्या कॅन्टोन्मेंट एरियामध्ये संचलन केले जाते. तर वायूदल दिन 8 ऑक्टोबर रोजी हिंडन येथील वायुतळावर पार पडतो.
सैन्य दिन आणि वायूदल दिनाचा जल्लोष देशभरात व्हायला हवा असे सरकारचे मानणे आहे. याचमुळे पुढील वायूदल दिन परेड चंदीगडमध्ये तर सैन्य दिन संचलन सदर्न कमांडर एरियामध्ये होणार आहे. भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्यालय महाराष्ट्रातील पुणे शहरात आहे.
पुढील वर्षाचे सैन्य दिन संचलन सदर्न कमांडमध्ये पार पडणार आहे. याकरता लवकरच ठिकाण निश्चित केले जाईल असे एका सैन्याधिकारीने सांगितले आहे. वायूदल दिन परेड हिंडन वायुतळावर दुसरीकडे हलविण्यामागे दोन कारणे आहेत. मोठे सोहळे दिल्लीपुरती मर्यादित राहू नये, ते देशाच्या अन्य हिस्स्यांमध्येही आयोजित केले जावेत, जेणेकरून अन्य ठिकाणचे लोक देखील यात सामील होऊ शकतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका आहे.
अन्य ठिकाणी महत्त्वाचे सोहळे आयोजित केल्याने देशभरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यात भाग घेण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत वायूदल दिन परेड हिंडन वायुतळावरच आयोजित व्हायचे. काही निवडक शाळांमधील विद्यार्थीच यात सामील होत असत, परंतु यापुढे हे चित्र बदलणार असल्याचे एका अन्य अधिकाऱयाने सांगितले आहे.
सैन्यदिन
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 जानेवारी 1949 रोजी ब्रिटिश कमांडर-इन-चीफ फ्रान्सिस रॉय बुचर यांच्या जागी लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा हे पहिले स्वदेशी कमांडर-इन-चीफ झाले होते. सैन्य दिन संचलन दिल्लीतील करियप्पा परेड ग्राउंडवर आयोजित होते. या दिवशी शौर्य पुरस्कार आणि सैन्यपदके देखील प्रदान केली जातात. पुढील वर्षी 73 वा सैन्य दिन साजरा केला जाणार आहे.
वायूदल दिन
1939 मध्ये ब्रिटिश साम्राज्याचे वायूदल म्हणून भारतात वायूदलाची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर याचे नाव काही काळ रॉयल एअरफोर्स ऑफ इंडिया राहिले होते. 1950 मध्ये नावातील रॉयल शब्द हटविण्यात आला. 2022 मध्ये देशाचा 90 वा वायूदल दिन साजरा केला जाणार आहे. 2006 साली वायूदल दिन परेड हिंडन वायुतळावर आयोजित होण्यास सुरुवात झाली, त्यापूर्वी वायूदल दिन परेड दिल्लीच्या पालम विमानतळावर पार पडत होते.









