चिनूक हेलिकॉप्टरमधून 18 सैनिकांसह मिनी बुलडोझर एअरलिफ्ट
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस, भूस्खलन आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागात मदत आणि बचाव कार्यासाठी आता लष्कर आणि वायुसेनाही उतरली आहे. कांगडा ते शिमल्यापर्यंत हवाई दल आणि लष्कराने आघाडी घेतली आहे. शिमला येथे वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरद्वारे 18 लष्करी जवान आणि एक मिनी डोझर एअरलिफ्ट करण्यात आले. शिमल्यातील अण्णा डेल मैदानावर चिनूक हेलिकॉप्टर उतरले असून मशिनिस्टलाही येथे सोडण्यात आले आहे.
हिमाचलमध्ये लष्कर, वायुसेना, एनडीआरएफ, एसडीआरएफ, क्मयूआरटीसह पोलिसांच्या पथकांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इंदोरा येथे वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने 71 जणांना बाहेर काढण्यात आले. हिमाचलमध्ये गेल्या 24 तासांत हलका पाऊस सुरू आहे. मंडईतील काही भागात मध्यम पाऊस झाला. मात्र पुढील चार दिवस हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
कांगडा जिह्यातील पोंग धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने फतेहपूर आणि मांड परिसर पाण्याखाली गेला आहे. येथे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातून एकूण 800 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. येथे हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तैनात केली आहेत. सध्या शिमल्यातही शिवमंदिरातील भूस्खलनाचा ढिगारा हटवण्यात लष्कराने पुढाकार घेतला आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही मदत आणि बचावकार्य सुरू होते. कांगडामध्ये आतापर्यंत एकूण 766 लोकांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी 213 जणांना हेलिकॉप्टरने, 422 जणांना बोटीद्वारे आणि 131 जणांना इतर मार्गाने वाचवण्यात आल्याचे कांगडाचे जिल्हाधिकारी निपुण जिंदाल यांनी सांगितले.









