एसी चेअरकार, ‘एक्झिक्मयुटिव्ह’मधील प्रवासभाड्यात 25 टक्क्यांपर्यंत कपात : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्व रेल्वेगाड्यांमधील एसी चेअर कार आणि एक्झिक्मयुटिव्ह क्लासमधील मूळ भाड्यात 25 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. ही तिकीट दरकपात एसी चेअरकार आणि व्हिस्टाडोम कोचसह एसी सीटिंग सुविधा असलेल्या सर्व टेनच्या एक्झिक्मयुटिव्ह क्लासमध्ये लागू होईल. या सवलतीचा लाभ प्रवाशांना तातडीने दिला जाणार आहे. परंतु यापूर्वी बुकिंग केलेल्यांना कोणताही परतावा दिला जाणार नाही. यासोबतच बुकिंग वाढवण्यासाठी टेनमध्ये फ्लेक्सी फेअर स्कीमवरही बंदी घालण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार वंदे भारतसह सर्व गाड्यांचे एसी चेअर कार, एक्झक्मियुटिव्ह क्लासचे भाडे 25 टक्क्मयांनी कमी होणार आहे. ही तिकीटकपात एसी चेअर कार आणि अनुभूती आणि विस्टाडोम डब्यांसह एसी सीटिंग सुविधा असलेल्या सर्व टेनच्या एक्झक्मियुटिव्ह क्लासमध्ये लागू राहील, असे रेल्वे बोर्डाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ही सवलत मूळ भाड्यावर जास्तीत जास्त 25 टक्क्मयांपर्यंतच जाहीर करण्यात आली आहे. मात्र, आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी, इत्यादी इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील, असेही सुचित करण्यात आले आहे.
वंदे भारत टेन आणि एसी चेअर कार गाड्यांचे भाडे कमी करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. टेनमध्ये जास्त प्रवाशांना प्रवास करता यावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून एसी सीट असलेल्या रेल्वेभाड्यात सवलत देण्यात येत आहे. सवलतीसाठी मंत्रालयाने यासंबंधीचे अधिकार विभागीय रेल्वेला प्रदान केले आहेत. गाड्यांचे तिकीटदर वाहतुकीच्या स्पर्धात्मक पद्धतीवर अवलंबून असेल. रेल्वे मंत्रालयाने सर्व रेल्वे झोनच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकांना एसी सीट असलेल्या टेनमध्ये सवलतीच्या भाडे योजना लागू करण्याचे अधिकार दिले आहेत. संबंधित अधिकारी आपल्या झोनमध्ये भाडे निश्चित करण्यास सक्षम असतील. या तिकीट दरकपातीसाठी गेल्या 30 दिवसात 50 टक्के प्रवासी असलेल्या गाड्यांचा विचार केला जाईल. सुटी किंवा सणासुदीच्या काळात धावणाऱ्या विशेष गाड्यांना ही योजना लागू होणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
भाडे कधीपासून आणि कसे कमी होणार
भाड्यात सवलत देताना अंतर आणि भाडे यांचाही विचार केला जाईल. एखाद्या रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यात किंवा शेवटच्या टप्प्यात किंवा प्रवासाच्या मध्यभागीही तिकीटदरात सवलत दिली जाऊ शकते. तथापि, तिकीट सवलतीचा दर संबंधित विभागातील किंवा टप्प्यातील एकूण प्रवासी क्षमतेचा विचार करून निश्चित केला जाणार आहे. तिकीट दरातील फेरबदल तत्काळ प्रभावाने लागू केली जाईल. मात्र, आधीच बुकिंग केलेल्या प्रवाशांना भाड्याचा कोणताही परतावा दिला जाणार नाही, हेही महत्त्वाचे आहे.
सवलतीचा कालावधी
भाड्यातील सवलत झोनल ऑफिसरने ठरविलेल्या कालावधीसाठी लागू असेल. सद्यस्थितीत सहा महिन्यांच्या कालावधीचा विचार केला जाऊ शकतो. मागणीनुसार संपूर्ण कालावधीसाठी किंवा काही महिन्यांसाठी किंवा आठवडा किंवा सहा महिन्यांसाठी सवलतीचे भाडे दिले जाऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विभागीय रेल्वेंच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत करून भाड्यात सूट दिली जाऊ शकते.









