‘स्त्रीहट्ट’ आणि ‘बालहट्ट’ हे आपल्याला काय करायला भाग पाडतील, हे समजून घेणे कठीण आहे. या दोन हट्टांच्या पोटी अनेक जुगाडांचा जन्म झाला आहे. सध्या इन्स्टाग्रामवर असाच एक जुगाड पहावयास मिळत असून तो चांगलाच लोकप्रियही झाल्या असल्याचे दिसून येते. एका व्यक्तीच्या पत्नीने वातानुकुलीत कार खरेदी करण्याचे टुमणे पतीच्या मागे लावले होते. या व्यक्तीजवळ बाईक होती. नवी एसी कार घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. पण पत्नीला तर एसी गाडीच हवी होती. तिच्या रात्रंदिवस चाललेल्या भुणभुणीमुळे हा व्यक्ती वैतागला होता.
याच हट्टापोटी त्याला एक जुगाड सुचला आणि त्याने आपल्या बाईकचेच रुपांतर एसी कारमध्ये करण्याचा निर्धार केला. या व्यक्तीचे नाव शिवम चौरसिया असे आहे. आता बाईकवरुन जाताना एसी कारमधून गेल्यासारखा ‘फील’ निर्माण करणे अवघड काम आहे. त्यासाठी त्याने एक युक्ती केली. बाईकला कोणतेही छत नसते किंवा आवरण नसते, जसे कारला असते. कार सर्वबाजूंनी बंदिस्त असल्याने आतली हवा थंड करता येते. बाईकला ही सोय नसते. त्यामुळे त्याने बाईकच्या अवतीभोवतीची हवा थंड करण्याचा मार्ग शोधून काढला. त्याने बाईकच्या हँडलला दोन पाईप जोडले. हे पाईप वरच्या बाजूला एकमेकांना जोडलेले आहेत. या पाईप्सना ‘फॉगर’ जोडलेले आहेत, जे बाईक चालविणाऱ्या आणि त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर येतात. या पाईपला एक जाळी जोडलेली आहे. ही जाळीही या दोन्ही व्यक्तींच्या डोक्यावर छतासारखी पसरलेली आहे. फॉगरमधून जाळीवर पाण्याचे तुषार पडतात. त्यामुळे खालची हवा थंड होते. अशा प्रकारे एसी कारमधून प्रवास केल्याचा अनुभव मिळतो, असे चौरसिया यांचे म्हणणे आहे. सध्या सोशल मिडियावर या जुगाडाची बरीच चर्चा होत आहे.









