सदरचे ध्येय वर्षाअखेरीसर्पंयत करणार प्राप्त : डेप्युटी गव्हर्नर रविशंकर यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई :
वर्ष 2023 च्या अखेरीस सेंट्रल बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) म्हणजेच ई-रुपी व्यवहार प्रतिदिन 10 लाखांपर्यंत वाढवण्याचे केंद्रीय बँकेचे लक्ष्य आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी सांगितले आहे. रविशंकर यावेळी बोलताना म्हणाले, की सध्या ही व्यवहारांची संख्या ई-रुपयांमध्ये दररोज 5,000 ते 10,000 इतकी आहे. सीबीडीसीचे यूपीआय प्रणालीसह आंतर-ऑपरेशन जून, 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेले चलनविषयक धोरण पुनरावलोकन जुलै अखेरीस प्रत्यक्षात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
चलनविषयक धोरणाने बँकांना सीबीडीसीत सहभागी करण्याबाबत…
चलनविषयक धोरण आढाव्याने अधिक बँकांना सीबीडीसीत सहभागी होण्याची गरज अधोरेखित केली आहे. आरबीआयने नोव्हेंबर 2022 मध्ये घाऊक सीबीडीसीची प्रायोगिक चाचणी सुरू केली होती आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये किरकोळ वापराची प्रायोगिक चाचणी केली होती.
प्रायोगिक चाचणीत बँकांची संख्या आता आठ वरून 13 झाली आहे यामुळे हा प्रवास आगामी काळात सोपा होणार असल्याचेही डेप्युटी गव्हर्नर टी.रविशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
13 लाख सीबीडीसी वापरकर्ते
तीन लाख व्यापाऱ्यांसह 13 लाख सीबीडीसी वापरकर्ते आहेत. या प्रणालीसाठी दररोज 10 लाख व्यवहार ही मोठी गोष्ट नाही. सध्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अंतर्गत 31 कोटी व्यवहार केले जातात. डेप्युटी गव्हर्नर म्हणाले की, सध्या सर्व प्रयत्न सीबीडीसीच्या वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यावर केंद्रित आहेत. एप्रिलअखेर ही संख्या फक्त एक लाख होती ती आता 13 लाख झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.









