ताहिर हुसैन मुस्तफाबादमधून निवडणूक लढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा पक्ष एआयएमआयएमची एंट्री झाली आहे. ओवैसी यांच्या पक्षाने आता एका कलंकित चेहऱ्याला मुस्तफाबाद मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे. 2020 च्या दिल्ली दंगलीचा आरोपी असलेला ताहिर हुसैन हा एआयएमआयएमचा उमेदवार असणार आहे. ताहिर हा सध्या तुरुंगात आहे.
ताहिर हुसैन यांचा आमच्या पक्षात प्रवेश झाला असून त्याला मुस्तफाबाद मतदारसंघाची उमेदवारी देण्यात येत असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक छायाचित्र पोस्ट करत म्हटले आहे.
दिल्ली महापालिका नगरसेवक ताहिर हुसैनने आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. तो आता दिल्लीच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद मतदारसंघात आमचा उमेदवार असेल. त्याच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी मंगळवारी माझी भेट घेत पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती ओवैसी यांनी दिली आहे. संबंधित छायाचित्रात ताहिरचे कुटुंबीय आणि समर्थक हे ओवैसी यांच्यासोबत दिसून येत आहेत. तसेच शोएब जमई आणि एआयएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील देखील यात दिसून येतात.
दिल्ली दंगलीचा आरोपी ताहिर हुसैन हा आम आदमी पक्षाचा नगरसेवक राहिला आहे. दिल्ली दंगलीत त्याचा सहभाग आढळून आल्यावर आम आदमी पक्षाने त्याला निलंबित केले होते. ताहिर हुसैनवर आयबी अधिकारी अंकित शर्माची निर्घृण हत्या करण्याचाही आरोप आहे. दंगलीदरम्यान ताहिरच्या घरावरून दगड अन् पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले हेते. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
‘आप’च्या अडचणी वाढणार
दिल्लीतील मुस्तफाबाद मतदारसंघात मुस्लीम मते ही निर्णायक मानली जातात. तेथे आम आदमी पक्षचे हाजी युनूस हे आमदार आहेत. परंतु यावेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारून आदिल खान यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. ताहिर हुसैनने मुस्लीम मते विभागल्यास तेथे आम आदमी पक्ष अडचणीत येणार आहे. 2015 मध्ये भाजपने या मतदारसंघात विजय मिळविला होता.









