ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशातील वाढत्या लोकसंख्येच्या मुद्द्यावरून नेहमीच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विजयादशमी’ सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशातील धार्मिक असंतुलनावर भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांनी चांगलाच समाचार घेतलाय. “मुस्लीम लोकांची लोकसंख्या वाढत नसून कमी होत आहे. तुम्ही त्याचा उगाच तणाव घेऊ नका. कुटुंब नियोजन सर्वात जास्त मुस्लीम लोक करत आहेत. सर्वात जास्त कंडोम मुस्लीम समाज वापरत आहे. यावर मोहन भागवत बोलणार नाहीत” असे प्रत्युत्तर ओवैसी यांनी दिले आहे.
एका सभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले की, देशातील मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नसून कमी होत आहे. भागवतांनी उगाचच टेन्शन घेऊ नये, मुस्लिमांचा TFR कमी होतोय. दोन मुलांना जन्म देताना त्यांच्यातील वयाचं अंतर हे मुस्लिमांमध्ये वाढतोय. परंतु देशात सर्वात जास्त कंडोमचा वापर कोण करतंय, यावर मोहन भागवत बोलणार नाहीत, असं म्हणत असदुद्दीन ओवेसींनी भागवतांवर पलटवार केला आहे.

भाजपा नेत्यांच्या वडिलांनी किती अपत्यांना जन्म दिला? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. मुस्लिमांच्या लोकसंख्येवर तपशीलानुसार बोलायला हवं, असा सल्ला ओवैसी यांनी भागवतांना दिला. देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही, असे मोहन भागवतांनी दसऱ्याच्या विजयादशमी सोहळ्यात म्हटले होते. एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात, असा इशारा भागवत यांनी दिला होता. देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी मोहन भागवत यांनी केली होती.
काय म्हणाले होते मोहन भागवत?
विजयादशमीनिमित्त स्वयंसेवकांना संबोधित करताना आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, जेव्हा एखाद्या देशाच्य लोकसंख्येमध्ये असंतुलन असतं तेव्हा त्याच्या भौगोलिक सीमांमध्येही परिवर्तन होत असतं. जन्मदरातील असमानतेसह लालसा, लोभ आणि घुसखोरींसारखेही प्रकार घडत असतात, त्यामुळं देशात धार्मिक लोकसंख्येचंही संतुलन राखलं जाणं गरजेचं आहे, याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळं सर्वच धर्मातील लोकांची लोकसंख्या नियंत्रित ठेवायची असेल तर त्यासाठी समान लोकसंख्या कार्यक्रम राबवण्याची गरज असल्याचं वक्तव्य मोहन भागवतांनी केलं होतं. त्यानंतर आता त्याला असदुद्दीन ओवेसींनी प्रत्युत्तर दिलं आहे.









