मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : महोत्सवाचे पणजीत शानदार उद्घाटन
पणजी : विकसित भारतासाठी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्तचा वापर आणि उपयोग करण्याचे धोरण असून त्यातून दिव्यांगांचाही विकास साधण्याचे ध्येय ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. राजधानी पणजीतील ईएसजी संकुलात खास उभारण्यात आलेल्या मंडपात पर्पल फेस्तचे शानदार उद्घाटन झाले. या महोत्सवातून दिव्यांगांना संधी आणि प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळणार असून त्यातूनच दिव्यांगांना पुढे जाण्याची प्रेरणा लाभणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्रकुमार यांनी सांगितले. उद्घाटनानंतर डॉ. सावंत पुढे म्हणाले की, पर्पल महोत्सव हा दिव्यांगांसाठी रोल मॉडेल आहे. दिव्यांगांना सर्व साधनसुविधा तसेच त्यांचे कल्याण व्हावे म्हणून मोदी सरकार प्रयत्नशील असून दिव्यांशू केंद्र प्रत्येक राज्यात सुरु करण्याची त्यांची सूचना आहे. त्यानुसार गोव्यातही दिव्यांशू केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यातून दिव्यांगांना आवश्यक ती सर्व उपकरणे देण्यात येणार आहेत. गोव्यात दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वेगळे खाते तयार करून ते कार्यरत करण्यात आले आहे. त्या शिवाय बहुतेक सर्व इमारतांमध्ये दिव्यांगांना प्रवेश सुकर व्हावा म्हणून विशेष मार्ग तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जगाला प्रेरणा देणारा महोत्सव
पर्पल फेस्तातून दिव्यांगाना पुढे जाण्याची, आपली कला दाखवण्याची ताकद मिळत आहे. हा महोत्सव देशासह जगाला प्रेरणा देणारा असून प्रत्येक राज्याने त्यापासून आदर्श घेऊन असे महोत्सव सुरू केले आहेत. या महोत्सवातून दिव्यांगांना मोठा सन्मान मिळत असून समुद्रातून तरंगण्याचा अनुभव प्राप्त होत आहे. दिव्यांग प्रतिभेचा आविष्कार पर्पल महोत्सवातून घडत असून खेळात भारतीय दिव्यांगांनी मोठी चमक दाखवून कामगिरी बजावली आहे. दिव्यांग मागे राहू नयेत आणि ते इतरांप्रमाणे पुढे जावेत म्हणून पर्पल फेस्त महत्त्वाचे असल्याचे डॉ. वींरेंद्रकुमार यांनी नमूद केले.
गोवा पर्पल फेस्तासाठी ‘बेस्ट’ : आठवले
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणातून गोवा हे पर्पल फेस्तसाठी ‘बेस्ट’ असल्याचे नमूद केले. दिव्यांग हे सर्वच क्षेत्रात सक्रिय आहेत. हेच पर्पल फेस्तामधून दिसून येते. दिव्यांगांना ऊर्जा, उत्साह देण्यासाठी असे महोत्सव आवश्यक आहेत. त्याकरीता आपले खाते सर्वतोपरी मदत देण्यास बांधील असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिव्यांग आता होतील सक्षम : फळदेसाई
दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पर्पल महोत्सवाबाबत सांगितले की, 2023 पासून हा महोत्सव चालू असून आता त्याचे स्वरुप आंतरराष्ट्रीय झाले आहे. दिव्यांगांच्या जीवनात चैतन्य आणणारा हा महोत्सव असून आता ती एक मोठी चळवळ झाली आहे. त्यातूनच दिव्यांग आता सक्षम होत आहेत. त्यांचे हित साकारणारा हा महोत्सव असल्याचे नमूद केले. दिव्यांग सक्षमीकरण खाते संचालिका वर्षा नाईक यांनी स्वागत केले तर दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी आतापर्यंतच्या पर्पल फेस्तांचा आढावा घेतला. महोत्सवाचे स्वरुप आता राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय झाले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. हा महोत्सव म्हणजे दिव्यांगांसाठीची मोठी चळवळ बनली असल्याचे सांगितले.
व्हिक्टरी आर्ट फाऊंडेशन गोवा या संस्थेने नृत्याचा आविष्कार घडवत गणेशवंदना सादर केली. त्यात सर्व दिव्यांग विशेष मुले सहभागी झाली होती. त्यास उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करून चांगलीच दाद दिली. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, युनायटेड नेशन्सचे प्रतिनिधी थेंबी थार्प, दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल, त्याच खात्याचे गोवा सचिव प्रसन्न आचार्य, मुख्य सचिव डॉ. कंदवेलू, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांची उपस्थिती होती.
ईएसजी संकुलात स्टॉलचे प्रदर्शन
उद्घाटनानंतर पुढे तीन दिवस म्हणजे 10 ते 12 ऑक्टोबर असा हा महोत्सव राज्यातील विविध ठिकाणी चालणार आहे. ईएसजी संकुलात महोत्सवाचे प्रमुख ठिकाण असून तेथे विविध स्टॉलचे मोठे प्रदर्शन भरले आहे. ते सर्वांसाठी खुले असून महोत्सवात दिव्यांगांशी संबंधित विविध विषयावर स्पर्धा, उपक्रम होणार आहेत.









