सातव्या विज्ञान चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन

प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवभारत निर्माणाचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी ’मेक इन इंडियाचा’ नारा दिला आहे. तो सत्यात उतरविण्यासाठी आजच्या युवा पिढीने मेक इन इंडियाच्याही पुढे जाताना ’मेक इट फॉर वर्ल्ड’ म्हणजेच जगासाठी निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गोवा विज्ञान परिषदेतर्फे आयनॉक्स आणि मॅकनिझ परिसरात आयोजित सातव्या भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे मंगळवारी मुख्यमंत्री सावंत यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासोबत जिनो फार्मास्युटिकल्सचे डॉ. सागर साळगावकर, इस्त्रोचे ग्रुप संचालक डॉ. टी. पी. दास, विज्ञान भारतीचे राष्ट्रीय आयोजन सचिव जयंत सहस्त्रबुद्धे आणि विज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुहास गोडसे उपस्थित होते.

विज्ञान परिषदेच्या कार्याचे कौतुक करताना डॉ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान चित्रपट क्षेत्राची ओळख करून देण्याबरोबरच, विविध उपक्रमांद्वारे नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि देशातील वैज्ञानिक संस्थांची ओळख करून देण्यासाठी, अनेक वर्षांपासून विज्ञान परिषद कार्यरत आहे, असे सांगितले.
विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी राज्यातील वैज्ञानिक संस्थांमध्ये फील्ड ट्रिप आयोजित कराव्या, जेणेकरून ते विज्ञान विषयाशी लवकर समरस होतील आणि बालवयातच विज्ञानाची आवड निर्माण होईल. या महोत्सवात इस्रो सारख्या संस्थेचे वैज्ञानिक उपस्थित राहणार आहेत. त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कलागुणांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. खास करून विज्ञान शिक्षकांनी या संधीचा फायदा विद्यार्थ्यांना मिळवून द्यावा, त्यातून एखाद्या विद्यार्थ्यामधून वैज्ञानिक तयार होऊ शकेल. यावर आताच विचार व्हावा. हीच योग्य वेळ आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आशियातील सर्वोत्तम कचरा प्रक्रिया प्रकल्प आपल्या गोव्यात साळगाव येथे आहे. कचऱयापासून वीजनिर्मिती होत असल्याचे आतापर्यंत ऐकले आहे. साळगावात ते प्रत्यक्षात सुरू आहे. अशा सुविधेमागील तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी देशभरातून अनेक लोक येथे येतात. गोमंतकीयांनीही खास करून विद्यार्थ्यांनी या प्रकल्पास भेट देऊन तेथील कामकाज प्रत्यक्ष पाहिले पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.
आपल्या राज्यात घडत असलेल्या गोष्टीची माहिती सर्वप्रथम आम्हाला ज्ञात असावी. राज्यात अनेक वैज्ञानिक संस्था आहेत. शिक्षकांनी पुढाकार घेऊन अशा संस्थांना भेटी द्यायला हव्या. या संस्थांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे गरजेचे आहे. त्यातूनच राज्यात अधिक शास्त्रज्ञ तयार होऊ शकतील आणि पंतप्रधान मोदी यांचे नवभारत निर्माणाचे स्वप्न साध्य होऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विज्ञान हा आपल्या दैंनदिन जीवनाचा भाग
विज्ञान हा केवळ एक शैक्षणिक विषय नसून आपल्या दैंनदिन जीवनाचा एक भाग आहे. आपण सभोवती जे काही पाहतो, ते विज्ञानाचेच एक उत्पादन आहे. तुम्हाला आयुष्यात काही करायचे आहे, तर ते कसे करावे, याची दिशा तुम्हाला विज्ञान दाखवते. नवनवीन वैज्ञानिक प्रयोग व संशोधन जाणून घेण्यासाठी भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव, गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी आहे, असे डॉ. साळगावकर यांनी सांगितले.
पुढील 25 वर्षात भारत जगाचे नेतृत्व करेल : सहस्त्रबुद्धे
गेल्या 75 वर्षात देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र खूप मोठय़ा प्रमाणात विकसित झाले आहे. परंतु, आपला देश अद्याप स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होणे बाकी आहे. त्यामुळे या दिशेने आम्हाला अधिक काम करण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू, तेव्हा भारत केवळ आत्मनिर्भरच नव्हे तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करणारा देश असेल, अशी आशा श्री. सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन यांनी स्वागत केले तर गोडसे यांनी आभार व्यक्त केले.
डॉ. मेनन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक लेव्हिन्सन मार्टिन्स यांनी दुपारी इनोव्हेशन आणि इन्स्टिटय़ूशनल एक्स्पो -2022 चे उद्घाटन केले.
आयआयटी गोवा, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉन बॉस्को इंजिनियत्रिंग कॉलेज, स्टेमपिडिया, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी, नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशन रिसर्च, भारतीय कृषी अनुसंधन परिषद, सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट, गोवा इनोवेशन काऊन्सिल आणि एटीएल या संस्थेचा इनोव्हेशन आणि इन्स्टिटय़ूशनल एक्स्पो -2022 मध्ये सहभाग आहे. सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूटने प्रथमच या विज्ञान एक्स्पोमध्ये भाग घेतला आहे.









