2026 ची विधानसभा निवडणूक जिंकण्याचे लक्ष्य : द्रमुकला आव्हान देणार
वृत्तसंस्था/ चेन्नई
अण्णाद्रमुकचे महासचिव एडप्पादी के. पलानिस्वामी यांनी महिला आणि मुलांच्या विरोधात असलेल्या गुन्ह्यांवरून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्यावर निशाणा साधला. यादरम्यान पलानिस्वामी यांनी अण्णाद्रमुक 2026 च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला पराभूत करण्यासाठी महाआघाडी स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे.
पलानिस्वामी यांनी पक्षाच्या इलैग्यार्गल-इलम पेंगल पासराई शाखेच्या एका कार्यक्रमाला संबोधित केले. यादरम्यान त्यांनी द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांनी केलेल्या राज्यात द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचे घटक एकाच विचारसरणीचे असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर सर्व एकसारखे आहेत, तर वेगवेगळ्या पक्षांची गरजच काय? सर्व पक्ष द्रमुकमध्ये विलीन केले जाऊ शकतात असे पलानिस्वामी म्हणाले.
मतांचे विभाजन रोखणार
अण्णाद्रमुकच्या संबंधात निवडणूक आघाडी आणि विचारसरणी दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निवडणूक आघाडीचा उद्देश केवळ निवडणुकीत जिंकणे आणि मतांचे विभाजन रोखणे असतो. 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अण्णाद्रमुकच्या नेतृत्वात शक्तिची विजयी आघाडी स्थापन केली जाणार आहे. लोक, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अण्णाद्रमुक पुढील सरकार स्थापन करेल अशाप्रकारे ही निवडणूक आघाडीसाठी लढावी असे उद्गार पलानिस्वामी यांनी काढले आहेत.
स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर उपरोधिक टिप्पणी
स्टॅलिन यांनी युवा आपल्याला अप्पा (पिता) असे संबोधित असल्याचा दावा केला होता. लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या महिला आणि मुलींची हाक स्टॅलिन यांना ऐकू येत नाही का अशी उपरोधिक विचारणा पलानिस्वामी यांनी केली आहे. तसेच त्यांनी द्रमुकवर दुटप्पणीपणाचा आरोप केला. द्रमुकने एम. करुणानिधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ टपाल तिकीट प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्र्यांसोबत भाग घेतला होता. इंडी आघाडीचे घटक पक्ष प्रतिबद्धत नाहीत असा दावा पलानिस्वामी यांनी केला.
द्रमुक संधीसाधू असल्याचा आरोप
पलानिस्वामी यांनी द्रमुकवर संधीसाधू असल्याचा आरोप केला. द्रमुक सत्तेसाठी स्वत:ची विचारसरणी बदलतो. द्रमुकने 1991 मध्ये भाजप आणि काँग्रेससोबत आघाडी केली होती. स्टॅलिन यांच्याकडे अण्णाद्रुमकवर टीका करण्याशिवाय कुठलेच काम राहिले नाही असे पलानिस्वामी यांनी म्हटले आहे.
आवश्यक निधी केंद्राने जारी करावा
तामिळनाडू केवळ तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषा धोरणाचे पालन करणार आहे. अण्णाद्रमुक देखील या धोरणासाठी प्रतिबद्ध आहे. केंद्र सरकारने राज्यासाठी आवश्यक निधी जारी करावा असे पलानिस्वामी यांनी म्हटले आहे. स्टॅलिन यांनी अलिकडेच केंद्र सरकारवर नवे शिक्षण धोरण न लागू केल्याने निधी जारी न करण्याचा आरोप केला होता. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे राज्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावाही स्टॅलिन यांनी केला होता.









