तामिळनाडूत भाजपची वाढली अडचण : अण्णाद्रमुककडून आघाडी संपुष्टात आणण्याचा इशारा
वृत्तसंस्था~ चेन्नई
तामिळनाडूतील भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या एका नव्या टिप्पणीमुळे दक्षिणेत स्वत:चा प्रभाव निर्माण करू पाहणाऱ्या भाजपच्या प्रयत्नांना झटका बसू शकतो. अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपचा सहकारी पक्ष अण्णाद्रमुकच्या माजी प्रमुख जयललिता यांच्यावर अप्रत्यक्ष स्वरुपात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अण्णामलाई यांच्या या टिप्पणीमुळे अण्णाद्रमुक अत्यंत संतप्त झाला असून पक्षाने आघाडी संपुष्टात आणण्याचा इशारा भाजपला दिला आहे.
अण्णामलाई हे कुठल्याही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होण्याच्या पात्रतेचे नाहीत. अण्णामलाई यांनी विचारपूर्वक वक्तव्यं करावीत. भाजप-अण्णाद्रमुक आघाडी कायम रहावी अशी त्यांची इच्छा नसावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांना लोकसभा निवडणुकीत विजयी व्हावेत असेही त्यांना वाटत नसावे. अण्णामलाई यांना तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास माहित नसल्याची टीका अण्णाद्रमुकाचे वरिष्ठ नेते डी. जयकुमार यांनी केली आहे.
सद्यघडीला निवडणूक झाल्यास अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी राज्यात 30 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजयी होण्यास सक्षम आहे. अण्णामलाई यांना भाजपने कर्नाटकात सह-प्रभारीपद दिले होते, परंतु भाजप तेथे विजयी होण्यास अपयशी ठरला होता. एका दिवंगत व्यक्तीवर टिप्पणी करणे निंदनीय आहे. अमित शाह आणि जगतप्रकाश न•ा यांनी अण्णामलाई यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अन्यथा अण्णाद्रमुक आघाडीसंबंधी पुनर्विचार करणार असल्याचे जयकुमार यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूतील पक्ष विदुथलाई चिरुथैगल कच्चीचे अध्यक्ष थिरुमवलावन यांनीही अण्णामलाई यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. भाजप आमचा सहकारी पक्ष अण्णाद्रमुक आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांना लक्ष्य करत आहे. घटक पक्षाला अशाप्रकारची वागणूक देणे योग्य नाही. अण्णामलाई हे माजी मुख्यमंत्र्यांसोबत तामिळनाडूचा अपमान करत आहेत. उत्तरेच्या ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तेथे कुठलीच कायदा-सुव्यवस्था नाही, तरीही अण्णामलाई हे तामिळनाडूला सर्वात भ्रष्ट ठरवून राज्याचा अपमान करत असल्याचा दावा थिरुमवलावन यांनी केला आहे.
अण्णामलाई यांची टिप्पणी
तामिळनाडूतील अनेक सरकारे भ्रष्ट होती. माजी मुख्यमंत्र्याला कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरविण्यात आले होते. याचमुळे तामिळनाडू हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांपैकी एक असल्याची टिप्पणी अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत केली होती. अण्णामलाई यांची ही टिप्पणी जयललिता यांना उद्देशून असल्याचे मानले जात आहे. कारण बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जयललिता यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वीच जयललिता यांचे निधन झाले होते.
भाजपच्या अडचणी वाढणार
कर्नाटकातील पराभवानंतर भाजपला दक्षिण भारतातील स्वत:चा राजकीय प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. अलिकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूचा दौरा केला आहे. यादरम्यान त्यांनी राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. परंतु अण्णामलाई यांच्या टिप्पणीमुळे अण्णाद्रमुकसोबत असलेली आघाडी संपुष्टात आल्यास या राज्यात भाजपला यश मिळणे अवघड ठरणार आहे.









