पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : न्यूयॉर्कमध्ये भारतीयांकडून कार्यक्रम आयोजित
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जगासाठी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पण माझ्यासाठी एआय म्हणजे अमेरिकन-भारतीय आहे. अमेरिका-भारत एक आत्मा आहे. हा एआय आत्मा भारत-अमेरिका संबंधांना नवीन उंची देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. न्यूयॉर्कमधील भारतीयांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला मोदींनी रविवारी संबोधित केले. 75 वर्षात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान लाँग आयलंडला आले आहेत. राज्यांतील 15,000 हून अधिक भारतीय प्रवासी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जमले आहेत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, जगातील अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू असल्यामुळे 2024 हे वर्ष संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे. दरम्यान, अनेक देशांमध्ये लोकशाही दिन साजरा केला जात आहे. या उत्सवात भारत आणि अमेरिका एकत्र आहेत. इथे अमेरिकेत निवडणुका होणार आहेत आणि भारतात आधीच निवडणुका झाल्या आहेत. भारतात झालेल्या निवडणुका या मानवी इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निवडणुका होत्या. तसेच अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास दुप्पट मतदार तर युरोपच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार भारतात मतदान करतात. हे प्रमाण पाहिल्यानंतर भारताचा आणखी अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.
आपण जिथेही जातो तिथे प्रत्येकाला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतो आणि सोबत घेतो. भारत मातेने आपल्याला जे शिकवले ते आपण कधीही विसरू शकत नाही. शेकडो भाषा असलेल्या देशाचे आपण रहिवासी आहोत. भाषा अनेक असूनदेखील आपल्या भावना एकच आहे. ती भावना म्हणजे भारत माता की जय, असे मोदी म्हणाले.
माझ्यासाठी तुम्ही सर्वजण भारताचे मजबूत ब्रँड अॅम्बेसेडर आहात. म्हणूनच मी तुम्हाला ‘राष्ट्रीय राजदूत’ म्हणतो. मी अनेक वर्षे अनेक देशांत भटकत राहिलो. जिथे जेवायला मिळालं तिथे जेवलो. जिथे झोपायला मिळाले तिथे झोपलो. मी काहीतरी वेगळे करायचे ठरवले होते पण नियतीने मला राजकारणात नेले. एक दिवस मी मुख्यमंत्री होईन, असा कधीही विचार केला नव्हता. मी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपदी राहिलो. लोकांनी मला बढती दिली, पंतप्रधान झालो. जनतेने मोठ्या विश्वासाने तिसऱ्यांदा सत्ता सोपविली, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.









