माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांची माहिती : ‘बिल्ड विथ ए. आय. विथ गुगल डेव्हलपर्स’ परिषद
पणजी : आय. टी. व डिजिटल क्षेत्रातील गोव्याच्या प्रगतीला गती देणारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. गोवा सरकार गोव्यातील नागरिकांसाठी आता 241 सेवांच्या सुविधा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करणार आहे. प्रशासनातील विविध आव्हानांसाठी ए. आय. आधारित उपाय योजले जात आहेत, अशी माहिती माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. गोव्यातील पहिली ए. आय. परिषद ‘बिल्ड विथ ए. आय-विथ गुगल डेव्हलपर्स’च्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. पणजी येथे आयोजित या कार्यक्रमात 400 हून अधिक विद्यार्थी, संशोधक, उद्योगप्रमुख, डेव्हलपर्स व धोरणनिर्माते यांची उपस्थिती होती. गुगल फॉर डेव्हलपर्स आणि गुगल डेव्हलपर ग्रुप गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महत्त्वपूर्ण परिषदेमध्ये गोव्याला ए.आय. तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. या कार्यक्रमाचा उद्देश गोव्यातील लोकांना ए.आय. तंत्रज्ञानाचे महत्त्व समजून, त्याचा उपयोग कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन करणे होते.
या परिषदमध्ये मंत्री खंवटे यांनी राज्याच्या डिजिटल परिवर्तनावर आणि शासकीय कार्यपद्धतीत ए. आय. च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. राज्य सरकारच्या पुढाकाराबद्दल माहिती दिली आणि नागरिकांसाठी सेवा अधिक सुलभ करण्यासाठी ए.आय. चा वापर कसा होईल यावर चर्चा केली. गुगल क्लाऊडचे प्रॉडक्ट स्ट्रॅटेजी प्रमुख सिद्धार्थ प्रकाश यांनी या संधीवर चर्चा केली. ‘ए.आय. चा वापर संपूर्ण जगभरामध्ये सध्या एक महत्त्वपूर्ण वळण घेत आहे. छोट्या उद्योगांसाठी ए.आय.चा वापर ग्राहकांच्या गरजा समजून त्यांना योग्य उत्पादने दाखवण्यास मदत करू शकतो, असे त्यांनी नमूद केले आहे. 2025 मध्ये ए.आय. तंत्रज्ञानासाठी जागतिक स्तरावर 320 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक होईल. भारतामध्ये इंडिया ए.आय. मिशनसारखी महत्त्वपूर्ण योजनाही राबवली जात आहे, अशी माहिती सोफ्युल्डचे संस्थापक आणि या परिषदेचे मुख्य आयोजक प्रज्योत माईणकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमात गोव्यातील स्टार्टअप्ससाठी नेटवर्किंग संधी, आणि ए.आय. तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन देणाऱ्या चर्चासत्रांचा समावेश होता. गोव्यातील संशोधक, डेव्हलपर्स, आणि स्टार्टअप्सच्या योगदानाने गोवा लवकरच ए.आय. क्षेत्रात एक महत्त्वाचे केंद्र बनविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. असे एकंदरीत या परिषदेच्या माध्यमातून दिसून आले. गोव्यात ए.आय. च्या क्षेत्रात अधिक प्रगती साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ए.आय. आधारित उपाय विकसित करणे गरजेचे
‘हॅकॅथॉनसारख्या उपक्रमांमुळे सरकार आणि स्टार्टअप्स यांच्यातील सहकार्याला चालना मिळू शकते, ज्यामुळे शासकीय आव्हानांवर नवीन उपाय शोधले जाऊ शकतात. युवा नवकल्पकांनी गोव्याच्या भविष्याच्या दृष्टीने ए.आय. आधारित उपाय विकसित केले पाहिजेत. सरकार या सर्व उपक्रमांना धोरणात्मक पातळीवर पूर्ण पाठिंबा देण्यास कटिबद्ध असल्याचेही मंत्री खंवटे यांनी नमूद केले आहे. त्याचप्रमाणे सरकार विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी स्टार्टअप धोरणामध्ये सुधारणा करण्याची योजना करत आहे. या प्रकल्पांची निवड कॉलेजच्या शिफारशीवर आधारित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
जागतिक क्षमता केंद्रासाठी प्रयत्न
गोवा सरकार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केलेल्या दोन जागतिक क्षमता केंद्रांपैकी एक गोव्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, गोव्यात हे केंद्र स्थापनेसाठी महत्त्वाकांक्षीपणे कार्य सुरू असून, यामुळे मोठ्या कंपन्यांचे आकर्षण होईल आणि आयटी क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता येईल. यासाठी 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने विकसीत शहरांमध्ये ही केंद्रे स्थापन करण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन करणारा राष्ट्रीय फ्रेमवर्क तयार करण्याची घोषणा केली आहे.
राज्यात 543 अधिकृत स्टार्टअप
राज्यात सध्या 543 अधिकृत स्टार्टअप आहेत, ज्यांच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न सरकारतर्फे सुरू आहे. आयटी, स्टार्टअप आणि एआय भविष्यात वेगळीच ओळख निर्माण करणार आहे. त्यानुसार राज्यात स्टार्टअपसाठी आवश्यक निधी व इतर साधनसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. रोजगार निर्माण करण्याचे कार्य या स्टार्टअपनी केले पाहिजे.
तुये येथे लवकरच आयटी व्हिलेज
तुये येथे लवकरच आयटी व्हिलेज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तिथे जागा निश्चित केली असून सध्या तिथे 100 हून अधिक राज्यभरातील युवक डिझाईनचे काम करत आहेत. हजारोंच्या संख्येने येथे रोजगार निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे गोव्यात आयटी आधारित उद्योगाला यश मिळण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. अशी माहिती देखील मंत्री खंवटे यांनी दिली आहे.









