सोशल मीडिया वापरत असताना बरेचदा आपल्या टाईमलाईनवर चॅट-जीपीटीची जाहिरात येत असते किंवा अनेक कामे करण्यासाठी एआय टूल्सच्या विविध जाहिराती येत असतात. कदाचित आपल्याला प्रश्न पडतो, की हे चॅट-जीपीटी काय आहे आणि आज इतका त्याचा बोलबाला का झाला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर हे एक लिखित किंवा तोंडी संभाषण करणारे टूल आहे.
आता परत संभाषण करणारे टूल म्हणजे तरी काय? तर जर तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर त्याचे त्वरीत उत्तर आपल्याला मिळते. उदा. म्हणजे मला समजा एक रजेचा ई-मेल लिहायचा असेल तर हे चॅटबोट्स आपल्याला ई-मेल तयार करुन देईल. किंवा मला समजा गोवा येथे फिरायला जायचे आहे तर हे चॅटबोट्स गोवा येथे जायचे कसे, बघण्याची स्थळे कोणती, जेवण कोणते इ. माहिती देते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पाहिजे ती माहिती हे चॅटबोट्स देते. हे चॅटबोट्स आर्टिफिशल इंटेलिजन्स व विशिष्ट अल्गोरिदमचा वापर करुन तयार केलेले सॉफ्टवेअर आहे, जे युझरच्या विविध शंकांचे समाधान करते. आज कित्येक कंपन्या किंवा युजर्स देखील चॅटबोट्सचा वापर करताना आढळतात. एका सर्वेक्षणानुसार 47 टक्के ग्राहक चॅटबोट्सचा वापर करून खरेदी करताना दिसतात तर अनेक व्यावसायिक आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी कमी अधिक क्षमतेने चॅटबोट्सचा वापर करताना आढळतात. चॅटबोट्स तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबरोबर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा उपयोग केला जातो. आपल्याला माहित आहे की मानव विचार व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतो. आपल्या मनातील अत्यंत क्लिष्ट विचार व्यक्त करण्यासाठी भाषाद्वारे तो इतरांपर्यंत पोहोचू शकतो.
साधारण 1950साली अॅलन ट्युरिंग या एक महान कॉम्प्युटर तज्ञाने एक संकल्पना मांडली. ती म्हणजे की माणसाची विचार करण्याची क्षमता जर कॉम्प्युटरमध्ये आली तर काय होऊ शकते. याच कल्पनेतून पुढे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या संकल्पनेचा उदय झाला. पण 1980च्या दशकापर्यंत फारशी परिस्थिती बदलली नाही. त्यानंतर संगणक शास्त्र अत्यंत झपाट्याने वाढत गेले. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर कुठे होऊ शकतो यावर संशोधन झाले आणि आज मशीन लर्निंगच्या अल्गोरिदमचा वापर करून वेगवेगळे प्रोग्रॅम्स दिसू लागले. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये अनेक ज्ञानशाखांचा उपयोग केला जात आहे. यामध्ये कॉम्प्युटरशास्त्र भाषाशास्त्र, इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांना एकमेकांशी जोडून हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तयार होते. चॅटबोट्समध्ये याच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा उपयोग होतो. आपण बोललेल्या शब्दांचे मजकुरामध्ये रूपांतर करणे शक्य झाले आहे. यालाच आपण स्पीच रेकग्निशन किंवा ऑडिओ टू टेक्स्ट असेही म्हणतो. गुगल असिस्टंट हे त्याचे उत्तम उदाहरण.
आज अनेक कंपन्या आपल्या कामासाठी विविध चॅटबोट्स तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी स्लॅक, टेलिग्राम, विचॅट या कंपन्या काम करत आहेत. चॅटवेल, मेनीचॅट, मायक्रोसॉफ्ट कॉन्व्हर्स, मोशन ए आय, चॅटसुट अशा अनेक कंपन्या चॅटबोट्स टूल्स निर्माण करण्याच्या मार्गावर आहेत. या व्यतिरिक्त नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तसंच आवाज ऐकून त्याचं रूपांतर मजकुरामध्ये करणेसाठी आयबीएम, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल या कंपन्या काम करत आहेत. गुगल असिस्टंट, अॅमेझॉन अलेक्सा, मायक्रोसॉफ्ट कोर्टाना, सिरी हे सगळी पर्सनल असिस्टंट चॅटबॉक्स आहेत. या कंपन्यांनी आपापली प्रॉडक्टस व उपकरणांची निर्मिती केली आहे आणि त्यात त्यांचे संशोधन व सुधारणा वेगाने चालू आहे.
चॅट बोट्समुळे एक गोष्ट साध्य झाली आहे ती म्हणजे, प्रत्येक कंपनीला म्हणजेच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये 24 तास 365 दिवस अविरत न कंटाळता सेवा देणे शक्य झाले आहे. कस्टमरला चटकन उत्तर मिळणे, व्हॉईस रेकॉर्ड ऐकवत न ठेवणे, कुठल्याही प्रॉडक्टच्या माहितीसाठी त्वरित उत्तर उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. काही कंपन्या आपल्या अकाउंटिंग, कॉस्टिंग, इन्व्हेंटरी, ह्युमन रिसोर्स अशा विविध खात्यांमध्येही या चॅटबोट्सचा वापर करून कंपनीची कार्यक्षमता, कर्मचाऱ्यांचे आणि ग्राहकांचे समाधान वाढवू पाहत आहेत.
या चॅटबोट्समुळे आज अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये या एआय-चॅटबोट्स येत असलेल्या लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात चॅट बोट्स डिझायनर म्हणून काम करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. प्रश्नांची उत्तरे देणे, कस्टमरला खरेदीचा सुखद अनुभव देणेसाठी चॅटबोटची रचना करणे, चॅटबोट्स निर्माण करणाऱ्या उद्योगांमध्ये अशा लोकांना नोकरी उपलब्ध होणार आहे. जसे बिजनेस अॅनॅलिस्ट असतात तसे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधले अॅनॅलिस्ट असतील. हे संगणकातले तज्ञ नाहीत पण या टूल्सची क्षमता व मर्यादा ओळखून विशिष्ट उद्योगांमध्ये याचा उपयोग कसा करावा, कोणते सल्ले द्यावेत हे ठरवतील. त्याचप्रमाणे मशीन लर्निंगचा उपयोग करून कारखान्यात केव्हा, कुठे व कशा प्रकारचे चॅट्स वापरता येतील हे सांगतील. कंपनीमध्ये कुठच्या डिपार्टमेंटमध्ये कुठला चॅट वापरता येईल हे ठरवणे, याचं प्लॅनिंग करणेसाठी माणसं लागणार आहेत.
आज सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करून जाहिराती करणे, लोकांच्या आवडीनिवडी, पूर्वीचे त्यांचे खरेदीचे पॅटर्न ओळखून कंपनीचा सेल ठरवणे, विशिष्ट ग्राहकांना ठराविक वेळेमध्ये जाहिराती त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देणं, त्याचा फॉलोअप घेणे या गोष्टींचा नियोजन करण्यासाठी मार्केटिंग तज्ञ सल्लागार लागणार आहेत. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी समुपदेशन करणारे समुपदेशक ही या चॅटबोट्सचा उपयोग करू शकतात. एआय टूल्सचा वापर करून शिक्षण पद्धतीत अनेक बदल होऊ लागले आहेत. याचा अतिशय कल्पकतेने उपयोग शिक्षण पद्धतीमध्ये होऊ शकतो. यामध्ये संभाषण कौशल्य, टीमवर्क असे काही प्रयोग होऊ शकतात. वर्गामध्ये शिकवण्यासाठी एखादा विषय समजून सांगण्यासाठी या टूल्स आणि चॅट बोट्सचा उपयोग होऊ शकतो.
वकिली व्यवसायामध्येसुद्धा याचा वापर होऊ शकतो. निकाल लागलेल्या केसेस कोणत्या, त्याचा न्याय निवाडा कशा पद्धतीने झाला, कुठले संदर्भ वापरले हे काही क्षणात वकिलांना मिळू शकते. पत्रकारही या चॅटबोटसचा वापर करू शकतात. एखाद्या घटनेचा संपूर्ण तपशील तयार करणे किंवा घडलेल्या घटनेची तपशीलवार माहिती सहज शक्य होणार आहे.
थोडक्यात काय तर या एआय-चॅटबोट्स हे भविष्यात माणसाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्यासाठी बनवले गेलेले टूल आहे असे म्हणायला हरकत नाही. या टूलचा अत्यंत कल्पकतेने जर वापर केला तर कुठल्याही व्यवसायामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये माणसांची कार्यक्षमता वाढेल आणि त्याचा त्याला आर्थिक सामाजिक फायदा होईल.
-विनायक राजाध्यक्ष








