‘एएआयबी’कडून 26 दिवसांत कार्यवाही : अंतिम अहवालाला तीन महिने लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अहमदाबाद विमान अपघाताच्या 26 दिवसांनंतर मंगळवारी विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) केंद्र सरकारला प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. प्राथमिक चौकशीत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून हा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. आता सविस्तर अंतिम चौकशी अहवाल येण्यास 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
गुजरातमधील दुर्घटनेनंतर एएआयबी प्रत्येक कोनातून चौकशी करत आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून अनेक एजन्सी एकत्रितपणे तपासात गुंतल्या आहेत. ‘एएआयबी’ने तपासासाठी एक बहु-विद्याशाखीय पथक तयार केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार, स्थापन केलेल्या पथकाचे नेतृत्व एएआयबीचे डीजी करत आहेत. डीजीसीएच्या (नागरी उ•यन महासंचालनालय) आदेशानुसार, एअर इंडियाच्या सर्व 33 ड्रीमलायनर विमानांची तपासणी करण्यात आली असून सर्व काही सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.
विमान दुर्घटनेनंतर दोन्ही ब्लॅक बॉक्स सापडले असून त्याचा तपास करण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात. ब्लॅक बॉक्सचा तपास भारतातच सुरू असून परदेशात पाठवण्यात आलेले नाहीत. ब्लॅकबॉक्समधील सीव्हीआर आणि एफडीआरची तपासणी केली जात आहे. सविस्तर अहवाल तीन महिन्यात येण्याची शक्यता आहे.
विमान अपघाताची सर्व बाजूंनी चौकशी केली जात असल्याचे यापूर्वी 28 जून रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते. या तपासामध्ये तांत्रिक बिघाडासोबतच कट रचण्याची शक्यता (तोडफोड) देखील तपासली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे फ्लाइट एआय 171 टेकऑफनंतर लगेचच मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीला धडकले होते. त्यानंतर लागलेल्या आगीत 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 270 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघातात फक्त एक प्रवासी बचावला होता.









