ठेवींच्या बदल्यात भाडय़ाचे घर मोफत देण्याचे आमिष : कायदेशीर व्यवहार करून 50 जणांची फसवणूक : घर-दागिने विकून, कर्ज काढून लोकांनी दिले पैसे
प्रतिनिधी / वास्को
मुदत ठेवीच्या बदल्यात राहायला मोफत घर देण्याच्या आमिषाने वास्कोतील पन्नासहून अधिक लोकांना सुमारे सात कोटी रूपयांचा गंडा घालण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलेला आहे. फसवणूक झालेल्या लोकांची संख्या व गंडा घालण्यात आलेली रक्कम मोठी असून आतापर्यंत या प्रकरणी वास्को पोलीस स्थानकात आठ तक्रारी नोंद झालेल्या आहेत. ही फसवणूक करणारा नूर अहम्मद वास्को शहरातच व्यवसाय करीत होता, मात्र तो सध्या बेपत्ता आहे.
फसल्या गेलेल्या वास्कोतील लोकांनी गुरूवारी स्थानिक आमदार दाजी साळकर यांचीही भेट घेऊन या प्रकरणात मदत करण्याची मागणी केली. आमदार साळकर यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभिर्याने तपास करतील असे आमदार साळकर यांनी म्हटले आहे.
वास्कोतील मांगोरहिल, नवेवाडे, बायणा, दाबोळी तसेच इतर भागातील लोकांना या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागलेले असून यापैकी सर्व लोक भाडय़ाच्या घरात राहणारेच आहेत. आपल्याकडे मुदत ठेव म्हणून काही लाखांची रक्कम ठेवल्यास मोफत राहण्याची व्यवस्था करतो. घर सोडताना रक्कम परत करतो, असे आमिष नूर अहम्मद हा लोकांना दाखवत होता. त्याच्या या आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेतलेले पन्नासहून अधिक कुटुंब प्रमुख काल गुरूवारी सकाळी वास्को पोलीस स्थानकासमोर गर्दी करून होते. प्रत्येकाने चार लाखांपासून दहा लाखांपर्यंतची रक्कम त्याच्याकडे जमा केली होती.
कायदेशीर व्यवहार करून केली सात कोटींची फसवणूक
फसल्या गेलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व आर्थिक व्यवहार पूर्णपणे कायदेशीररीत्या करण्यात येत होता. या आर्थिक व्यवहाराचे प्रतिज्ञापत्र नोटरीमार्फत करण्यात येत होते. आगाऊ धनादेशही देण्यात येत होते. व्यवहार कायदेशीर असल्यानेच बरेच लोक नूर अहम्मद याच्या आमिषांना बळी पडले. मागच्या साधारण दोन वर्षांपासून त्याने अशापध्दतीने लोकांकडून लाखो रूपये जमा करणे सुरू केले होते. मात्र आता तो कुठे गायब झाला हे सध्या कुणालाच माहित नाही. सध्या या लोकांचा भार पोलीस चौकशीवरच आहे. पोलिसांनी चौकशी हाती घेतली आहे.
घर विकून, कर्ज काढून, दागिने विकूनही जमा केले पैसे
अधिक माहितीनुसार काही लोकांनी कर्जे काढून, दागिने विकून तर काहींनी आपले राहते घर छोटे असल्याने ते विकून किंवा दुसऱयाला भाडय़ाने देऊन मोठय़ा घरात राहायला मिळेल व कुटुंबातील सर्व सदस्यांची सोय होईल अशा आशेने त्याच्याकडे लाखो रूपये जमा करून त्याने दिलेल्या घरात राहणे पसंद केले होते. रोख रक्कम जमा केलेल्या लोकांना सदर नूर अहम्मद स्वतःच एखादय़ा घरमालकाकडे करार करून त्यांना भाडय़ाने ठेवत होता. भाडे आपण फेडत होता. लोकांना राहायला दिलेले काही फ्लॅट त्याने आपलेच असल्याचेही भासवलेले होते.
हल्ली संपर्कात आलेल्या काहींना पैसे घेऊनही घर देण्यास चालढकल झाली होती. तसेच एकच घर दाखवून त्याने अनेकांकडून लाखो रूपये उकळले आहेत. त्यातच हल्ली भाडे थकू लागल्याने त्या मालकांनी चौकशी केली असता नूर अहम्मद सापडेनासा झाला. त्यामुळे त्यांनी फ्लॅटमध्ये राहणाऱया कुटुंबांना एक तर भाडे द्या किंवा फ्लॅट खाली करा असा तगादा लावलेला आहे. त्यामुळे हे लोक संकटात सापडले आहेत. स्वतःचे घर नाही आणि भाडय़ाचेही घर नाही अशी लोकांची परिस्थिती झालेली आहे. काही कर्जात सापडलेले आहेत. तर काहींचे दागिनेही गेलेले आहेत. बहुतेक लोक कष्टकरी आणि गरीब तसेच मध्यमवर्गीय असून अनेकांनी वास्को पोलीस स्थानकात रडत रडतच आपली कैफियत मांडली. या प्रकरणात काही फ्लॅट मालकांचीही फसवणूक झालेली आहे.
छाप पाडण्यासाठी लढवत होता विविध क्लुप्त्या
अधिक माहितीनुसार नूर महम्मद ही व्यक्ती परप्रांतीय असून बऱयाच वर्षांपूर्वी तो वास्कोतील एका हॉटेलात कामासाठी आला होता. तिथे काम करता करताच ते हॉटेलही तो चालवू लागला. त्याने इथूनच आपले अन्य जोडधंदेही सुरू केले. मागच्या चार पाच वर्षांपासून लोकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून फसवायलाही सुरू केले होते. एखादय़ाला वश करण्यासाठी भाडय़ाच्या लक्झरी गाडय़ांचा वापर करणे, थापा मारणे, गोड बोलणे अशी त्याच्या व्यवहाराची पध्दत बनली होती. रेल्वे स्थानकाजवळील भटक्या लोकांना जेवण देणे, त्यांना कपडे देणे, आपण देवभक्त असल्याचे भासवणे अशा प्रकारेही तो लोकांवर छाप पाडायचा प्रयत्न करीत होता. त्याच्याबद्दलच्या चांगल्या चर्चेमुळेच लोकांनी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता.
बेळगावतही फसवणूक झाल्याची शक्यता सध्या तरी गुंगारा दिलेल्या नूर अहम्मदविरूध्द वास्कोतील पन्नासहून अधिक लोक एकत्र आलेले आहेत. अद्यापही अनेकजण पुढे येण्याची शक्यता आहे. फसल्या गेलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी, पर्वरी, फोंडा आणि बेळगावसारख्या शहरातील लोकांकडून त्याने लाखो रूपये अशाच प्रकारचे आमिष दाखवून उकळलेले असून फसवणुकीचा आकडा दहा कोटीपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.









