इराणमध्ये 28 जूनला अध्यक्षपदाची निवडणूक
वृत्तसंस्था/ तेहरान
इराणचे कट्टरवादी माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी अध्यक्षीय निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून स्वत:च्या नावाची नोंदणी केली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूनंतर या पदासाठी 28 जून रोजी निवडणूक होणार आहे.
अहमदीनेजाद यांची नोंदणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या चिंता वाढवू शकते. इराण जलदपणे स्वत:चा आण्विक कार्यक्रम पुढे नेत असल्याने आणि अन्य कारणांमुळे इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील तणाव वाढला असताना अहमदीनेजाद हे देशाच्या राजकारणात परतले आहेत.
अहमदीनेजाद यांनी गृह मंत्रालयात जात स्वत:चे नाव संभाव्य उमेदवार म्हणून नोंदविले आहे. अहमदीनेजाद हे 2005-13 पर्यंत दोनवेळा इराणचे अध्यक्ष राहिले आहेत. इराणच्या कायद्यानुसार ते 4 वर्षांपर्यंत अध्यक्षीय कार्यालयाच्या बाहेर राहिल्याने पुन्हा निवडणूक लढविण्यास पात्र ठरले आहेत. 2009 मध्ये अहमदीनेजाद पुन्हा निवडून आल्यावर इराणमध्ये व्यापक निदर्शने झाली होती. या हिंसक निदर्शनांवेळी हजारो जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर कित्येक जण मारले गेले होते. अहमदीनेजाद स्वत:च्या आकर्षक योजना आणि घरनिर्मिती कार्यक्रमांमुळे गरीबांमध्ये लोकप्रिय आहेत.
इराणच नव्हे तर जगभरात वेगाने बदल घडत आहेत. आम्ही लवकरच सुखद परिवतंन पाहू अशी अपेक्षा असल्याचे अहमदीनेजाद यांनी अलिकडेच म्हटले होते. माजी अध्यक्षांना 2017 च्या निवडणुकीत भाग घेण्याची संधी नाकारयणत आली होती, यामुळे ते व्यवस्थेवर नाराज झाले होते. तसेच त्यांनी अली खामेनेई यांच्यावर जाहीर टीका केली होती.









