वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मनमोहनसिंग सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात गाजलेल्या आगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी आरोपी ख्रिश्तियन मिचेल जेम्स याचा जामीन न्यायालयाने संमत केला आहे. या हेलिकॉप्टर विक्रीचे कंत्राट मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाच देण्यात आली होती. आरोपी जेम्स याने या व्यवहारात मध्यस्थी करुन दलाली लाटली होती, असा आरोप त्याच्यावर आहे.
हे प्रकरण 14 वर्षांपूर्वीचे आहे. या प्रकरणी सुनावणी पुढची 25 वर्षे होणे शक्य नाही. त्यामुळे आरोपीला अडकवून ठेवता येणार नाही. त्याची जामिनावर मुक्तता करावी लागणार आहे. जेम्स याला सहा वर्षांपूर्वी, अर्थात 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी 2013 मध्ये मनमोहनसिंग सरकारच्या काळात त्याच्यावर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. तथापि, त्याचवेळी त्याला अटक करण्यात आली नव्हती. ती 2018 मध्ये करण्यात आली होती.
प्रकरण काय आहे ?
भारतात अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी इटलीच्या आगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून 12 आधुनिक हेलिकॉप्टर्स विकत घेण्याचा करार मनमोहनसिंग सरकारने केला होता. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात किकबॅक्स देण्यात आले होते. तसेच हे कंत्राट मिळवून देण्यासाठी आगुस्ता वेस्टलँड कंपनीने नेमलेल्या दलालांनी भारतातील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाच दिली होती, असा आरोप सीबीआयकडून ठेवण्यात आला. या व्यवहारात भारताची 2 हजार 666 कोटी रुपयांची हानी झाल्याचा आरोपही सीबीआयने ठेवला होता.









