दमदार पाऊस नसल्याचा परिणाम : वळिवाच्या हुलकावणीमुळे शेतकरी अडचणीत : बैलजोड्यांचे प्रमाण घटल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
रोहिणी नक्षत्राला 25 मे पासून सुरुवात झाली आहे. 6 जूनपासून मृग नक्षत्रालाही सुरुवात होणार आहे. परंतु कंग्राळी बुद्रुक परिसरामध्ये अजूनही पेरणीपूर्व मशागतीसाठी लागणारा दमदार पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तरच्या काही भागात दमदार पाऊस झाला आहे. परंतु कंग्राळी बुद्रुक परिसरामधील कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड, यमनापूर भागामध्ये दमदार पावसाची गरज आहे. या भागाला पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला नसल्याचे दिसून येत आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण भागामधील शेतकरी धूळवाफ भातपेरणी करत असल्याचे दिसून येत आहे. कंग्राळी परिसरामध्ये 25 टक्के भातपेरणी तर 75 टक्के भातरोप लागवडीवर भर दिला जातो. परंतु 25 टक्के भातपेरणी करणारे शेतकरीसुद्धा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत.
तालुक्यामध्ये बैलजोड्यांचे प्रमाण घटले, ट्रॅक्टरांना काम वाढले
सध्या तालुक्यातील बैलजोड्यांची संख्या पाहिल्यास आज प्रत्येक गावामध्ये बैलजोड्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. यामुळे मनुष्यबळसुध्दा स्वत:च्या घरामध्ये मिळत होते. यामुळे बैलजोड्यांनी शेती करणे अधिक पसंत करत होते. सध्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये एकत्र कुटुंब पद्धत लोप पावून विभक्त कुटुंब पद्धत आली आहे. यामुळे मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे प्रत्येक जण ट्रॅक्टरने मशागतीची कामे करून घेत आहेत.
परिसरात रोप लागवडीवर अधिक भर
कंग्राळी परिसरामधील शेतकरी रोप लागवडीवर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे. कारण भातपेरणी केल्यानंतर कोळपणी, भांगलण करावी लागते. त्यामुळे अधिक काम लागते. त्यातच भरीस भर म्हणून मजुरांचा तुटवडा भासत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. पावसामध्ये भातरोप लागवडीवेळी चार दिवस काम लागते. पण त्यानंतर किरकोळ भांगलण वगळता एकदम भातकापणी करायची. लागवडीमुळे भात उत्पादनामध्येही भरघोस वाढ होते. यामुळे पेरणीपेक्षा भातरोप लागवडीवर अधिक भर दिला जात असल्याचे मत जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.
कंग्राळी परिसरात ऊस लागवडीत वाढ
सध्या शेती कामे करण्यासाठी मनुष्य बळ कमी पडत आहे. ऊस पिकाला शासनाकडून प्रतिटन 3000 ते 3200 रुपयापर्यंत दर मिळत आहे. पूर्वी हा दर अगदी कमी होता. उसाची उचल वेळेत होत नव्हती. यामुळे शेतकरी भात पिकाकडे वळला होता. परंतु सध्या ऊस शेती अधिक फायद्याची होत असल्यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे वळला आहे. यामुळे कंग्राळी बुद्रुक, खुर्द, अलतगा, गौंडवाड भागामध्ये उसाची अधिक लागवड केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
रोहयो महिलाना लाभदायक, शेतकऱ्यांना त्रासिक
शासनाने सर्व सामान्य कुटुंबातील नागरिकांसाठी वर्षभर काम मिळून त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लावण्यासाठी रोजगार योजना सुरू केली आहे. यामुळे लाखो महिला व पुरुषांना दररोज रोजगार मिळत आहे. यामुळे सर्वसामान्यासाठी रोजगार हमी योजना लाभदायक ठरली आहे. परंतु शेतातील कामासाठी मजूर न मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.









