आठवडाभरात पावसाने भरून काढली तूट : सहा दिवसात विक्रमी 535 मिमी पावसाची नोंद
पणजी : गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने यंदाची पावसाची मोठी तूट जवळपास भरून काढली आहे. आठवडाभरापूर्वी राज्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त तूट होती. गेल्या सहा दिवसांमध्ये विक्रमी 535 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 901.8 मिमी (35 इंच) पाऊस झाला आहे. राज्याच्या अनेक भागात शेतीकामांना प्रारंभ झाला आहे. दि. 28 जूनपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हंगामातील एका दिवसात सर्वाधिक 142.5 मिमी. इतका पाऊस पडला. कालच्या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाच्या एक दिवशीय सर्वाधिक म्हणजे 107.2 मिमी पावसाने यंदाचे तुटीचे अंतर लक्षणीयरित्या कमी केले आहे. दि. 23 जूनपासून प्रारंभ झालेला हा पाऊस दि. 28 जून ते 3 जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणात कोसळला. त्यात 29 जून – 54.6 मिमी, 30 जून – 86.2, 1 जुलै – 84.5 आणि 2 जुलै- 59.5 मिमी एवढ्या पावसाचा समावेश होता.
ऑरेंज अलर्ट जारी
दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 7 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून सावधगिरीचा इशारा म्हणून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे खात्याने म्हटले आहे. काल मंगळवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यात 50.8 मिमी, मडगाव 68.2 मिमी, आणि सांगे 34.0 मिमी. पेडणेत 19.8 मिमी, पणजीत 52.6 मिमी, म्हापसा – 31.9 मिमी, फोंडा 40.0 मिमी, जुने गोवे – 32.8 मिमी, सांखळी – 10.2 मिमी, काणकोण 55.6 मिमी, दाबोळी – 85.8 मिमी आणि मुरगावात – 74.6 मिमी पावसाची नोंद झाली.
शेतीकामांना उत्साहात प्रारंभ
दरम्यान, या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून राज्याच्या अनेक भागात शेतीकामांना प्रारंभ झाला आहे. कृषी कामांसाठी हा पाऊस योग्य आहे, अशी माहिती कृषी खात्यातील अधिकाऱ्याने दिली आहे. सोमवारच्या तुलनेत काल मंगळवारी राज्यात पावसाचे प्रमाण किंचित कमी होते. दिवसभरात तुरळक सरी येऊन गेल्या. सायंकाळी व रात्री काही प्रमाणात जास्त पाऊस झाला.









