वारणानगर / प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीवरून जिल्ह्यात संघर्ष होतो तो संघर्ष होवू नये म्हणून एकत्रित निर्णय घेवून विकासात्मक प्रयत्न व्हावा म्हणून आपण प्रयत्न केला. गेली २० वर्षे आम्ही या कमिटीवर प्रतिनिधी पाठवित आहे पण मी कार्यकर्त्यांशी चर्चा करून एक पाऊल मागे घेतले व बिनविरोध साठी त्याग केला असे प्रतिपादन आमदार विनय कोरे यानी केले.
वारणानगर येथे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारार्थ पन्हाळा तालुक्यातील मतदारांचा मेळावा पार पडला त्यावेळी डॉ.विनय कोरे बोलत होते.
या मेळाव्यास खासदार संजय मंडलिक, आमदार पी एन पाटील, माजी आमदार के पी पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकूळचे संचालक अमरसिंह पाटील, बाळासाहेब खाडे, जिल्हा बँक संचालक रणवीर गायकवाड, विजयसिंह माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेत्यांची प्रमूख उपस्थिती होती.
यावेळी आ. कोरे म्हणाले कोल्हापूर मार्केट सध्या देशात प्रगतीपथावर आहे. गुळासह कांदा बटाटे, हळद आणि फळांना मोठी मागणी आहे यासाठी मार्केट कमिटीला आणखी चांगले दिवस आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न राहतील असे सांगितले.
कृषिमालाचे ब्ल्याक मार्केट होवू न देता व्यवहारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ई मार्केट सारखी नवी संगणक प्रणाली सुरू करण्याबरोबरच शांततेतून सहकाराची नवी विचारधारा जोपासण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार कोरे यांनी यावेळी केले.
खासदार संजय मंडलीक म्हणाले, मार्केट कमिटी निवडणूकीसाठी पॅनेल करताना आमदार विनय कोरे यांचेसह अन्य नेत्यांना कसरत करावी लागली बाजार समितीचा कारभार चांगला सुरु असून मतदारांनी या निवडणूकीत मताधिक्य द्यावे असे आवाहन केले.
आमदार पी एन पाटील म्हणाले, वारणेचे नावं तात्यासाहेब कोरेनी देशभर पसरले असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळावा यासाठी मार्केट कमिटीने प्रयत्न केला. कोल्हापूरच्या गुळाला मोठी मागणी असून गुळावरती निर्मिती करणारे प्रोजेक्ट उभे करून अन्य उत्पादने घेता येईल यासाठी प्रयत्न व्हावा.
प्रारंभी जि.प.सदस्य शिवाजीराव मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी अमरसिह पाटील, प्रकाश देसाई, दगडू पाटील घोटवडेकर, माजी जि प सदस्य प्रकाश पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी तालुक्यातील सर्व सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, संचालक,सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी आणि मतदार मोठया संख्येने उपस्थित होते. एन आर चोपडे यांनी सूत्रसंचालन तर प्रा जीवनकुमार शिंदे यांनी आभार मानले.









