शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीसह बहुमोल मार्गदर्शन
ओटवणे प्रतिनिधी
जिल्ह्यात खरीपाच्या हंगामास जोरदार प्रारंभ झाला असुन कृषी अधिकाऱ्यांसह कर्मचारी थेट शेतीच्या बांधावर उतरून शेतीच्या आधुनिक तसेच कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.खरीप विशेष मोहिमेतंर्गत कृषी विभाग दीड महिन्यापासूनच नियोजन करीत आहे. या अंतर्गत बियाणे बिजप्रक्रिया, सिंधुरत्न समृद्धी योजनेतंर्गत भात ,बियाणे व नागली बियाणे वाटप, विविध योजनांसाठी शेतकरी निवड, पी. एम. किसान ई- केवायसी कॅम्प, खरीप भात शेतीशाळा, कृषि संजीवनी सप्ताह, १ रूपयात भात पिक, नागली विमा आदी योजनांची शेतकरी बागायतदारांसाठी प्रचार व प्रसिद्धी सुरूच आहे.
कृषी विभागाच्यावतीने प्रमोद यशवंत देसाई यांच्या शेतात सिंधुरत्न समृद्धी योजनेअंतर्गत श्री पद्धतीने भात लागवडीच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी तालुका कृषि अधिकारी जी. एस. गोरे यांनी चक्क शेतातील चिखलात उतरून स्वतः बैलजोडी चालवित जमिनीची मशागत केली. तसेच बांदा मंडळातील आपल्या सहका-यांसमवेत अधिक उत्पादन देणा-या भात पिकाच्या ‘श्री’ पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच डेगवे येथील दादा भालचंद्र देसाई यांचे क्षेत्रात काजू फळबाग लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी यु. जी. भुईंबर, बांदा कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे, श्री. सरगुरू, डेगवे कृषी सहाय्यक माळी, तांबुळी कृषी सहाय्यक मिलिंद निकम, शेर्ला कृषी सहाय्यक श्रीम. बेळगुंदकर, नेतर्डे कृषी सहाय्यक श्रीम. सावंत, शेतकरी प्रमोद देसाई, दादा देसाई, आबा देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन बांदा कृषी पर्यवेक्षक प्रकाश घाडगे यांनी केले होते.









