वार्ताहर /उचगाव
उचगाव कृषी कार्यालय यांच्या विद्यमाने सन 2022-23 या वर्षामधील कृषी अभियान, जनजागृती ‘कृषी माहिती रथयात्रे’चा शुभारंभ सोमवारी सकाळी झाला. उचगाव मध्यवर्ती गणेश विठ्ठल मंदिराच्या प्रांगणातून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते पूजन करून रथयात्रेला चालना देण्यात आली. अध्यक्षस्थानी उचगाव ग्राम पंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार होते.
यावेळी साहाय्यक कृषी निर्देशक आर. बी. नायकर यांनी चन्नराज हट्टीहोळी यांचे व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. बुडा अध्यक्ष युवराज कदम, ग्रा. पं. उपाध्यक्षा मथुरा तेरसे, ता. पं. माजी अध्यक्ष एल. एस. होनगेकर, ग्रा. पं. माजी सदस्य बी. एस. होनगेकर, ग्राम पंचायतचे सर्व सदस्य व उचगाव कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील 43 गावांतील शेतकरी उपस्थित होते.कृषी खात्यामार्फत मंजूर झालेल्या स्पिंकलरचे साहित्य सुळग्याचे सुरेश डोणकरी व उचगावचे दत्ता पावशे यांना तसेच पॉवर टीलर मंजूर झालेले आंबेवाडी गावचे शेतकरी भोमाणी कांबळे यांना साहित्याचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कृषी माहिती रथयात्रा उचगाव कृषी कार्यालय कार्यक्षेत्रातील 43 गावांमधून नेण्यात येणार असून माहिती अभियानांतर्गत देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे उचगावचे कृषी अधिकारी सी. एस. नायक यांनी कळविले आहे.









