वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनासह अन्य संकटामध्येही भारताची कृषी निर्यात आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यान जवळपास 20 टक्क्यांनी वधारुन 50.21 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यान तांदूळ निर्यात कृषी धान्यांमध्ये 9.65 अब्ज डॉलर्ससोबत विदेशी चलन प्राप्त करुन देण्यात अग्रस्थानी राहिला आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 9.35 टक्क्यांनी अधिक राहिल्याची नोंद आहे. यामध्ये डेअरी उत्पादनांची निर्यात वर्ष 2020-21 ही 32.3 कोटी डॉलर्सच्या तुलनेत 2021-22 मध्ये 96 टक्क्यांनी वधारुन 63.4 कोटी डॉलर्सवर राहिली आहे.
निर्यात होणारे प्रमुख देश
प्रामुख्याने कृषी उत्पादने निर्यात होणाऱया देशांमध्ये बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम, अमेरिका, नेपाळ, मलेशिया, सौदी अरब, इंडोनेशिया, इराण आदींचा समावेश आहे.









