गुंजी : महामार्गाच्या कालव्याचे पाणी व्यवस्थितरित्या न वळविल्याने ते थेट येथील सर्व्हे नंबर 122 मध्ये शिरल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी रामा शिवाजी घाडी यांची महामार्गाजवळ शेती असून सदर शेतीमध्ये त्यांनी आठवड्यापूर्वी भात पेरणी केली आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे महामार्गाच्या कालव्याचे पाणी पेरणी केलेल्या शेतामध्ये शिरले. त्यामुळे शेतामध्ये मोठा खड्डा पडला असून, त्या खड्ड्यातील माती शेतीमध्ये पेरणी केलेल्या भात बियांणावर पडल्याने नुकसान झाले आहे. तसेच मधोमध उभा कालवा पडूनही शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे कष्ट आणि बी, बियांणे वाया गेले असून, त्या शेतकऱ्याच्या नुकसानीला रस्ता कंत्राटदार जबाबदार धरून गुंजीतील अनेक शेतकऱ्यांनी प्रकल्प व्यवस्थापक मोहनराव यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्यास भाग पाडले. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर मोहनराव यांनी तातडीने सदर पाणी योग्य ठिकाणी वळवण्याची आणि सदर शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली.
सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने कालवा खोदाई करून गटार बांधण्याची गरज
या भागात गेल्या सहा-सात वर्षापासून सुरू असलेले रस्ता महामार्गाचे काम अद्याप धिम्यागतीने सुरू असून, त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. महामार्गाच्या बाजूंनी जाणाऱ्या कालव्यांची नीट व्यवस्था न केल्याने येथील शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सदर महामार्गाचे काम करत असताना सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने कालवा खोदाई करून गटार बांधण्याची गरज येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यावेळी गुंजीचे शेतकरी रामा घाडी, शांताराम घाडी, बाबूराव घाडी, अल्ताफ बिच्चनावर, सोहेल मुजावर व इतर शेतकरी उपस्थित होते.









