शेतकरी दुहेरी संकटात : कृषी खात्याकडून सर्व्हे, शेतकऱ्यांना सल्ला
बेळगाव : जिल्ह्यात खरीप हंगाममध्ये वाढत्या पावसाने शेती पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्याबरोबर आता किडीचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. संततधार पावसामुळे नदी काठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिकातील पोषक द्रव्येही कमी होऊ लागली आहेत. त्यामुळ किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात 95 हजार हेक्टर क्षेत्रात चवळी पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक रामदुर्ग तालुक्यात 15456 हेक्टरात, रायबाग तालुक्यात 9615 हेक्टरात तर गोकाक तालुक्यात 8980 तर इतर तालुक्यातून 8450 हेक्टरात पेरणी झाली आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोगराई वाढू लागली आहे. परिणामी शेती पिकांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. दरम्यान कृषी अधिकारी शेतकऱ्यांनी बांधावर जाऊन किडीचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची पाहणी केली आहे. शिवाय पिकांच्या संरक्षण आणि व्यवस्थापनेसाठी उपाययोजनेबाबत शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.
पिकांचे संरक्षण करण्याचे संकट
जुलै मध्यापासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे विविध भागात पाणी साचून आहे. याचा परिणाम आता शेतीपिकांवर होताना दिसत आहे. विविध पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पिकांची पाने पिवळी होऊन गळू लागली आहेत. काही पिकांच्या पानांना छिद्रेदेखील पडली आहेत. रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने पिकांचे संरक्षण करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. एकीकडे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
कीड आटोक्यात आणण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांचे प्रयत्न
शेतकऱ्यांनी किडीवर आळा घालण्यासाठी किटक नाशकांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी जवळच्या रयत संपर्क केंद्राशी संपर्क साधावा. कीड आटोक्यात आणण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारीही पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
-शिवनगौडा पाटील, (सहसंचालक कृषी खाते)









