केएलईचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांची माहिती
बेळगाव : युवा पिढीला शेतीचे महत्त्व समजावे, यासाठी अत्याधुनिक सुविधांनीयुक्त कृषी विद्यालयाचा लवकरच शुभारंभ करण्यात येणार आहे. यरगट्टी (ता. सौंदत्ती) येथे 120 मुलांची क्षमता असलेले अत्याधुनिक महाविद्यालय उत्तर कर्नाटकातील पहिले ठरणार आहे, अशी माहिती केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली. लिंगराज महाविद्यालयाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. कोरे पुढे म्हणाले, हे महाविद्यालय धारवाडच्या कृषी विद्यापीठाशी संलग्न राहणार आहे. सरकारने 120 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला परवानगी दिली असून 60 टक्के विद्यार्थ्यांना कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून तर 40 टक्के विद्यार्थ्यांना केएलई संस्थेकडून नियमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. सरकारने प्रत्येक सेमिस्टरसाठी 60,500 रुपयांचे शुल्क निश्चित केले आहे. प्रवेशासाठी 50 टक्के मुले शेतकऱ्यांची असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कृषी अभ्यासक्रमासाठी 4 वर्षांचा कोर्स असून फलोत्पादन, बियाणे विज्ञान, तंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, खत उत्पादन, गांडूळखत, जैवसाधने आदींचे ज्ञान आदीसह एनसीसी, एनएसएस अध्यापनही तयार केले आहे, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन व अंतिम परीक्षांमध्ये अंतर्गत मूल्यांकन चाचण्या कृषी विद्यापीठातील तज्ञांकडून घेण्यात येणार आहेत. महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना अध्यापनकाळात सर्व अवजारांसह प्रयोगशाळेतील उपकरणे पुरविली जाणार आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय, जर्नल्स व वैज्ञानिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शेवटच्या 6 महिन्यांत प्रत्यक्ष शेतात उतरून कार्य करावे लागणार असून याद्वारेच त्यांचा 4 वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी केएलई संस्थेचे संचालक बी. आर. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्रमुख पी. एस. हुगार आदी उपस्थित होते.









