भारत-पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये ध्वज बैठक : 75 मिनिटे चर्चा : नियंत्रण रेषेवरील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर महत्त्व
वृत्तसंस्था/ पूंछ, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात ध्वज बैठक (फ्लॅग मिटिंग) पार पडली. पूंछ सेक्टरमधील चाका दा बाग (एलओसी ट्रेड सेंटर) येथे सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही बैठक सुमारे 75 मिनिटे चालली. या बैठकीमध्ये दोन्ही सैन्याच्या ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. बैठकीत दोन्ही बाजूंनी सीमेवर शांतता राखणे आणि युद्धबंदीवर सहमती दर्शवली. 25 फेब्रुवारी 2021 पासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धबंदी लागू आहे.
भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शुक्रवारी झालेली ध्वज बैठक 75 मिनिटे चालली. गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांमधील ही पहिलीच बैठक आहे. यापूर्वी शेवटची ध्वज बैठक 2021 मध्ये झाली होती. नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबार आणि आयईडी हल्ल्यांदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात शुक्रवारी ध्वज बैठक घेण्यात आली. अहवालानुसार, या बैठकीत सीमेवर शांतता राखणे आणि युद्धबंदीबाबत दोन्ही बाजूंमध्ये करार झाला आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने सीमेवर शांतता राखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्याबाबत चर्चा केली.
बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
बैठकीदरम्यान, दोन्ही बाजूंनी सीमेवर शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याची गरज मान्य केली. तसेच सीमेवरील शांततेच्या व्यापक हितासाठी युद्धबंदीच्या समझोत्याचा आदर करण्याचे मान्य केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील युद्धबंदी करारानंतर बराच काळ सीमेवर शांतता होती, परंतु अलिकडे गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. लष्कराच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी बाजूचे मोठे नुकसान होत आहे. पाक दहशतवादी वारंवार सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असले तरी भारतीय लष्कराकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सीमेवर जोरदार गोळीबार सुरू असताना ही बैठक घेण्यात आली.
गेल्या काही आठवड्यांपासून नियंत्रण रेषेवर तणाव आहे. 4 फेब्रुवारी रोजी लष्कराने 7 पाकिस्तानी घुसखोरांना ठार मारले होते. 13 फेब्रुवारी रोजीही पाकिस्तानी सैनिकांनी युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची बातमी आली. नंतर सैन्याने हे नाकारले. भारतीय सैन्याने 7 पाकिस्तानी घुसखोरांना ठार मारले होते. 4 फेब्रुवारीच्या रात्री पुंछ जिह्यातील कृष्णा घाटीजवळ नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न झाला तेव्हा ही घटना घडली. भारतीय सैन्याच्या पुढच्या चौकीवर हल्ला करण्याची योजना असल्याचा दावा सूत्रांनी केला.
14 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात गोरखा रायफल्सचे सहा सैनिक जखमी झाले. भवानी सेक्टरमधील मकरी भागात हा स्फोट झाला. खांबा किल्ल्याजवळ सैनिकांची एक तुकडी गस्त घालत असताना ही घटना घडली होती.
नियंत्रण रेषेवर ‘बॅट’ पथके सक्रिय
गेल्या 15 दिवसांपासून पाकिस्तानने सीमेपलीकडून आपले नापाक कारस्थान वाढवले आहे. पाकिस्तानने बॉर्डर अॅक्शन टीम म्हणजेच ‘बॅट’ सक्रिय केले आहे. यामागे पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संस्था आयएसआय असल्याचे बोलले जाते. ही ‘बॅट’ टीम भारतावर हल्ल्याचा कट रचण्यात व्यग्र आहे.









