ग्राहकांना लाईफ इन्शुरन्सची विविध जीवन विमा उत्पादने उपलब्ध होणार
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स यांच्यात 16 जून 2025 रोजी कॉर्पोरेट एजन्सी करार झाला. हा सामंजस्य करार लोकमान्य सोसायटीच्या बेळगाव येथील कॉर्पोरेट कार्यालयात करण्यात आला. या करारामुळे लोकमान्य सोसायटीच्या माध्यमातून ग्राहकांना ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सची विविध जीवन विमा उत्पादने उपलब्ध होणार आहेत. भारतातील मोठ्या लोकसंख्येला जीवन विम्याचे संरक्षण मिळावे या उद्देशाने दोन्ही संस्थांनी हा पुढाकार घेतला आहे. या भागीदारीमुळे विमा साक्षरतेचा प्रसार होऊन अधिकाधिक नागरिकांना आर्थिक सुरक्षेचे कवच मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स ही भारतातील एक अग्रगण्य जीवन विमा कंपनी असून ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन, नाविन्यपूर्ण उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा यासाठी ओळखली जाते.
याप्रसंगी बोलताना लोकमान्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित यांनी सांगितले की, “ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्ससोबतचा हा करार आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा योजनांचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना वर्धित मूल्य आणि उत्तम सेवा प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न या माध्यमातून अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.” या करारानंतर मान्यवरांनी औपचारिक स्वरूपात करारपत्रांची देवाणघेवाण केली. या कार्यक्रमात लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीकडून अभिजित दीक्षित (सीईओ), राहुल पाटील (ग्रुप हेड इन्शुरन्स), रोहन कंग्राळकर (मॅनेजर इन्शुरन्स), विराज मुचंडी (असिस्टंट मॅनेजर लाईफ इन्शुरन्स) हे उपस्थित होते. ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्सतर्फे मंधीर जुनेजा (वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रमुख कॉर्पोरेट एजन्सी ब्रोकर), प्रीतम परिहस्त (उपाध्यक्ष व प्रमुख यु सी बी कॉर्पोरेट एजन्सी ब्रोकर), प्रसान्त महाराणा (साहाय्यक उपाध्यक्ष बिझनेस डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी, को-ऑपरेटिव्ह बँक), दर्शक अशोक भट (साहाय्यक उपाध्यक्ष सेल्स हेड, बँका अशुरन्स) हे मान्यवर उपस्थित होते.









