प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेंतर्गत सेवा पुरविण्यासाठी केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व आयसीएमआर-एनआयटीएम यांच्यात नुकताच करार झाला. यापुढे सरकारी नियम व सरकारी दरानुसार कर्मचाऱयांना सेवा उपलब्ध होणार आहे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेडिशनल मेडिसीन व डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ आणि वैद्यकीय संशोधन केंद्र यांच्यात संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या उपस्थितीत करार झाला. आयसीएमआरचे संचालक डॉ. सुबर्णा रॉय, इस्पितळातील वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी करारावर स्वाक्षऱया केल्या.
यावेळी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे यांनी माजी केंद्रीय आरोग्यमंत्री कै. बी. शंकरानंद यांच्या आरोग्य क्षेत्रातील सेवेचे स्मरण केले. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी आयसीएमआरसोबत संशोधन केले जात आहे. आरोग्य रक्षणासाठी पारंपरिक व आधुनिक औषध पद्धतींचे एकत्रितपणे संशोधन करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी काहेरचे उपकुलगुरु डॉ. विवेक सावजी उपस्थित होते. थॉमस जेफर्सन विद्यापीठाची मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.









